नवी मुंबई : रेल्वेत प्रवासी बेसावध असल्याची संधी साधून त्यांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. संबंधित प्रकार हा 29 जुलैला सानपाडा रेल्वे स्थानकात घडला होता. डोंबिवलीला राहणारे अमरजितकुमार शहा हे रात्रीच्या सुमारास रेल्वेने जात असताना दोघा लुटारुंनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला होता. यावेळी शहा आणि इतर प्रवाशांनी धाडसाने एकाला पकडून वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याचं नाव शहावाज अजगरअली शेख असं असल्याचं समोर आलं. तो मानखुर्दला राहतो. तसेच त्याचा पळालेला साथीदाराचं नाव आलम खान असं होतं. तो देखील मानखुर्दचा रहिवासी होता. आरोपी शहावाजच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी पोलीस निरीक्षक घरटे, सहायक उपनिरीक्षक प्रकाश नलावडे, गणेश दराडे, प्रवीण मनवर, कुणाल शिंदे आदींचे पथक तयार केले. त्यांनी मानखुर्द परिसरात सापळा रचून आलम याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईलही जप्त केला आहे.
विशेष म्हणजे अशाचप्रकारे 1 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास तळोजा येथील रहिवासी अमरेंद्र दुबे यांचा मोबाईल चोरीला गेला होता. ते लोकलने मुंबईला जात असताना वाशीजवळ हा प्रकार घडला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वाशी रेल्वे पोलिसांनी CCTV तपासले असता त्यातून एका संशयिताची माहिती हाती लागली. त्याद्वारे अयान बेग याला मानखुर्द परिसरातून अटक करण्यात आली. आयान बेग याच्यावर वाशी, वडाळा, सीएसटी पोलीस ठाण्यात 4 ते 5 गुन्हे दाखल असून तिघेही सराईत गुन्हेगार आहेत.
हेही वाचा :
बंगळुरुच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष, यवतमाळला नेऊन अत्याचार, विवाहित भामट्याला बेड्या
जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी साताऱ्यात तरुणाची हत्या, चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन उलगडा