मुंबई : मुंबई जितकी स्वच्छ, भल्यामोठ्या उंच इमारतींची, सुंदर समुद्र किनाऱ्याची दिसते तितकंच तिच्या पोटात भरपूर काहितरी घडत असतं. बऱ्याच गोष्टी अर्थातच चांगल्या घडतात. पण काही गोष्टी प्रचंड भयानक, विश्वासाच्या पलिकडे आणि अनपेक्षित अशा असतात. आम्ही मायानगरी मुंबईत घडणाऱ्या क्राईम विषयी बोलतोय. मुंबईत नुकतीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीचीच हत्या केली. त्याचा मृतदेह घरातच गाढला. त्यानंतर ती काहीच घडलं नाही, आपल्याला माहिती नाही, अशा आवेशात पोलीस ठाण्यात जावून पती मिसिंग असल्याची तक्रार देवून आली. पण पोलिसांनी तपासाअंती तिचं बिंग अखेर फोडलंच.
दीपक सांगळे नावाचा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तो अनेक दिवासांपासून घरी आलाच नाही, अशी तक्रार त्याच्या पत्नीने 16 जूनला कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस ठाण्यात केली. दीपक सांगळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याने अनेक गुन्हे केले होते. त्यापैकी 4 गुन्हे हे विनोबा भावे पोलीस ठाण्यात आधीपासूनच दाखल होते. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर कुणी दीपकचं अपहरण किंवा हत्या तर केली नाही ना? असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी अनेक बाजूंनी विचार करुन तपास केला.
विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या पोलिसांसोबतच या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचं पथकही करत होतं. गुन्हे शाखेच्या पथकाला या प्रकरणाचा तपास करत असताना दीपक सांगळे कुठेच सापडला नाही. त्यामुळे पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला. गुन्हे शाखेने पत्नीला चौकशीसाठी बोलावलं. यावेळी चौकशीदरम्यान पत्नीने आपण पतीची हत्या केल्याची कबुली दिली.
मृतक दीपक सांगळे हा आपल्या पत्नीसह कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरात वास्तव्यास होता. त्याचा पत्नीसोबत सारखा वाद व्हायचा. अशाचप्रकारच्या एका वादातून रागत पत्नीने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पत्नीने जेवणात विष मिसळून पतीची हत्या केली. मृतक पती आपल्याला वारंवार त्रास देत असल्याने आपण हे पाऊल उचलल्याचं आरोपी पत्नीने सांगितल. या कृत्यात तिला काही नातेवाईकांनी देखील साथ दिली. आरोपी सरस्वती दीपक सांगळे हिने दिलेल्या कबुलीजाबाबानंतर गुन्हे शाखेने तिच्यासह सातजणांना बेड्या ठोकल्या. तसेच न्यायालयाच्या परवानगीनंतर मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.
सरस्वती दीपक सांगळे (वय 21 वर्षे)
मनीषा प्रशांत आचारी (वय 25 वर्षे)
आदीत मस्तराम गौतम (वय 19 वर्षे)
आनंद मस्तराम गौतम (वय 22 वर्षे)
विशाल राजू करांडे (वय 25 वर्षे)
किशोर प्रमोद साहू (वय 24 वर्षे)
रितीक प्रेमसिंह विश्वकर्मा (वय 22 वर्षे)
हेही वाचा :
बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास