मुंबई : माहिम परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. माहिम पोलिसांना 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला आहे हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने माहिम परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
माहीम परिसरात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या जखमी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.
धारदार शस्त्राच्या हल्ल्यामुळे तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आकाश संजय भालेराव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे, अशी माहिती माहिम पोलिसांनी दिली आहे.
तरुणावर हल्ला कोणी केला तसेच हल्ला करण्यामागील नेमके कारण काय असू शकेल, याचे धागेदोरे पोलिसांकडून शोधले जात आहे. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.