पुण्यातील पोर्श कार अपघाताच पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. तोच आता मुंबईतही असाच एक हिट अँड रनचा प्रकार घडला. रविवारी पहाटे एक बीएमडब्ल्यूने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाले. या अपघातास जबाबदार असलेला मिहीर शाह हा आरोपी सध्या फरार असून तो शिवसेना ( शिंदे) नेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी राजेश शाह यांच्यासह आणखी एकाल अटक केली मात्र काल त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात झाल्यानंतर आरोपी मिहीर आणि त्याचे वडील राजेश यांच्यात फोनवरून अनेक वेळा बोलणं झालं होतं. आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी थंड डोक्याने प्लान आखला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनीच मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याचेही उघड झाले.
अपघातानंतर मिहीरने वडिलांना फोन केला तेव्हा त्यांनी त्याला सीट बदलून ड्रायव्हरला( राजऋषी बिडावत) त्याच्या जागेवर बसवण्यास सांगितले होते. तसेच तू पळून जा, हा अपघात ड्रायव्हरने केल्याचे सांगू, असा सल्लाही राजेश यांनी दिला अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. याच राजेश शहा यांना सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
थंड डोक्याने आखली योजना
रविवारी पहाटे वरळीच्या ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला. त्यानंतर महिरीने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्याला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. तसेच या अपघाताचा आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लान होता. त्याप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला असे समजते. तसेच ज्या बीएमडब्ल्यूने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजनाही राजेश शाह यांनी आली होती, असेही चौकशीतून समोर आले आहे. जेणेकरुन मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.
आरोपींचा काय प्लान होता ?
पहाटे झालेल्या अपघातानंतर आरोपी मिहिरने घटनास्थळावरून पळ काढला. पश्चिमद्रूतगती मार्गे तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली. त्यामुळे त्याने ती गाडी वांद्रे कलानगर येथे सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिहिरने वडिलांना दिली. त्यानंतर मिहिरचे वडिल राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी राजेश शाह यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह व नंबरब्लेट काढून बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एवढंच नव्हे तर ती ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही पाचरण करण्यात आले होते. या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्याने ती गाडी अज्ञात स्थळी लपवण्याता आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र तेवढ्यात पोलिस तेथे आल्याने राजेश यांचा प्लान फसला.
राजेश यांनी आखलेल्या योजनेनुसार या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी चालक राजऋषी बिडावत वांद्रे येथेच थांबून राहिला होता. पोलिस त्याठिकाणी आल्यानंतर बिडावत आणि राजेश शहा यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राजेश शहा यांनी आखलेली योजना समोर आली.
मिहीर शहाच्या अटकेसाठी लूकआउट नोटीस जारी
हा अपघात झाल्यावर मिहिर शाह फरार झाला होता. तो काहीवेळ गोरेगाव परिसरातील त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी होता, नंतर तो तेथून निघाला आणि फरार झाला. या अपघाताला दोन ४८ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांन अद्याप त्याचा शोध लागलेला नसून त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो परराज्यात किंवा परदेशात पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.