मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : नजर हटी और दुर्घटना घटी…. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही म्हण माहिती असेलच. आयुष्य खूपच अनमोल आहे. ते असं वाऱ्यावर उधळून देणं काही चांगली गोष्ट नाही. पुढल्या क्षणी काय होईल सांगू शकत नाही. आजकाल बरेच जण सेल्फी, रील्सच्या नादात लोकल किंवा ट्रेनच्या प्रवासात अतरंगी चाळे करत असतात. किंवा ट्रॅकच्या मधे उभं राहून कारनामेही करतात. मात्र अशाच बेपर्वाईमुळे अपघात होऊ शकतो. एखादी व्यक्ती अपंग होते किंवा एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे देवाने दिलेलं हे आयुष्य जगताना फुकटची मस्ती उपयोगाची नाही.
रेल्वे ट्रॅकवरून चालणे धोकादायक असते, त्यामुळे ट्रॅकवरून (railway track) चालू नये असाच सल्ला नेहमी दिला जातो. मात्र बरेच जण हा सल्ला न ऐकता स्वत:च्याच मनासारखं करत असतात. काही जण तर गाडी येताना दिसत असूनही ट्रॅकवरून हलत नाही. जोशात, निडरपणे ते असं काहीतरी करायला जातात पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. पण हे दुर्लक्ष करणं जीवावरही बेतू शकतं. ट्रॅकवरील अशीच एक दुर्घटना (accident) पालघरजवळ घडली आहे.
तेथे रेल्वे इंजिनची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू तर आणखी एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. पालघर रेल्वे स्थानकामध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जखमी तरूणावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघे दोस्त एकत्र चालत होते अन् अचानक
पालघर रेल्वे स्थानकातील नवली फाटकाच्या दरम्यान दोन तरुण मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून ट्रॅकवरून चालत होते. बऱ्याच दिवसांनी निवांत गप्पा मारत होते. मात्र त्यांच्या गप्पांमध्ये ते एवढे गुंग झाले की मागून येणाऱ्या ट्रेनबद्दलही त्यांना समजलं नाही. रेल्वेच्या मोटरमनने हॉर्न वाजवून ट्रॅकवर चालणाऱ्या त्या दोघांना सावध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर रेल्वे इंजिनची त्या दोघांना जोरदार धडक बसली. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यापैकी एका तरूणाचा तेथेच मृत्यू झाल. तर दुसऱ्या जखमी तरूणाला उपचारांसाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आले