Mumbai Crime : रात्री अडीच वाजता फोन खणखणला, मेसेज ऐकून तो धावत निघाला आणि.. एका भावाची आपबिती ऐकून तुमचेही डोळे पाणावतील !

| Updated on: Oct 10, 2023 | 9:13 AM

नाईट शिफ्टसाठी निघालेल्या भावाला बाय करून तो घरी गेला. पण मध्यरात्री अचानक आलेल्या एका फोनने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. फोनवरचा तो मेसेज ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणाचा होता तो फोन ?

Mumbai Crime : रात्री अडीच वाजता फोन खणखणला, मेसेज ऐकून तो धावत निघाला आणि.. एका भावाची आपबिती ऐकून तुमचेही डोळे पाणावतील !
Follow us on

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : आयुष्य प्रचंड बेभरवशी आहे. आत्ता आपल्यासमोर असलेला माणूस पुढच्या क्षणी दिसेलच याची काहीच गॅरेंटी नाही. काल ज्यांच्याशी पोटभर गप्पा मारल्या, आज त्यांच्याबद्दल असं काही ऐकायला येऊ शकतं ज्यामुळे हळहळ वाटावी. भविष्याचं प्लानिंग करत आयुष्य जगणाऱ्यांना, उद्याचा दिवस उगवेल की नाही याची तरी शाश्वती असते का ? त्यामुळे आज, आत्ता जे आहे तो मनभरून जगून घ्या, हसा, आनंदी रहा, घरच्यांशी बोला. काय माहीत पुढचा क्षण काय घेऊन येईल ते !

अशीच एक अनपेक्षित आणि तितकीच दुर्दैवी, धक्कादायक घटना मुंबईत (accident in Mumbai) घडली आहे. ऑफीसमध्ये नाईट शिफ्टसाठी निघालेला तरूण दुसऱ्या दिवशी परत घरी आलाच नाही, आलं ते थेट त्याचं अचेतन शरीर. कंटनेर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने एका 25 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू ( 1 person dead) झाला. अंधेरी पूर्व येथे झालेल्या या अपघातात या निष्पाप तरूणाला थेट जीव गमवावा लागला. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ड्रायव्हर मात्र लगेचच तेथून फरार झाला. याप्रकरणी आरे सब-पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला असून फरार ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

मध्यरात्री खणखणला फोन आणि एका क्षणात सगळं बदललं….

नीरज गुप्ता (वय 25) असे मृत तरूणाचे नाव असून तो एअरटेलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. मालाड पूर्वेला राहणारा नीरज हा रविवारी रात्री, नाईट शिफट्साठी कामाला निघाला. त्याचा भाऊ धीरजला बाय करून तो मोटरसायकलवरून ऑफीसला गेला. मात्र मध्यरात्री 2.30 च्या सुमारास धीरज ( मृत इसमाचा भाऊ) याला मोबाईलवर एक कॉल आला. एवढ्या उशीरा फोन आल्याने तो धास्तावलाच.

फोनवर समोरील व्यक्तीने सांगितलेल्या मेसेजमुळे तर तो घाबरलाच. स्वत:ला कसंबसं आवरत त्याने जेव्हीएलआर रोडवर पामेरी नगर येथे धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्याला, त्याचा भाऊ नीरज एका ट्रकखाली अचेतन अवस्थेत पडलेला आढळला. तेथे उपस्थित असलेले पोलिसी अधिकारी आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने नीरजला कसबसं बाहेर काढलं. ट्रकने टक्कर दिल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. त्याच्या डोक्याला आणि मांडीला दुखापत झाली होती आणि कानांतूनही रक्त येत होतं. उपचारांसाठी त्याला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.