मुंबई | 16 जानेवारी 2024 : मुंबईत एक भीषण अपघात घडला आहे. बाईकवर ट्रिपल सीट बसणं तीन तरूणांना प्रचंड महागात पडलं. परळ ब्रीजवर डंपर आणि बाईकची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला. बाईक विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरवर जोरात आदळली आणि बाईकवर बसलेले तिघे खाली कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरूणींसह एका तरूणाचाही समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळ ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी 6.15-6.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. त्या ब्रिजवरून बाईकवरून दोन तरूणी आणि एकट तरूण असे ट्रिपल सीट प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या डंपरवर बाईक जोरात धडकली. त्या दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर ट्रकच्या पुढच्या भागाचंही बरंच नुकसान झालं आहे.
या धडकेनंतर बाईकवरील तिघे जण रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तीनही जखमींना KEM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. डंपर चालकाने स्वत:पोलीस स्टेशनला जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.