मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गुन्ह्यांचे (crime news) प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत मुंबईत ५९ हजार कोटींच्या फसवणुकीचे (fraud case) गुन्हे आर्थिक शाखेत दाखल झाले आहेत. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यातील फक्त 4 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले असून त्यांना गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली आहे.
माहिती अधिकाराअंतर्गत (RTI) ही माहिती प्राप्त झाली आहे. जानेवारी 2018 ते जुलै 2023 या कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेत सुमारे 594 गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एकूण 59 हजार 75 कोटी रुपयांची फसवणूक झाली. या 594 गुन्ह्यांपैकी 264 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून त्यात आरोपत्र अथवा गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. म्हणजेच निम्याहून अधिक प्रकरणे अद्यापही तपासाधीन असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट झाले आहे.
या कालावधीमध्ये 319 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर अवघ्या 14 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. म्हणजे अवघ्या 4 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले असून त्यांना शिक्षा झाली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे 59 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असले तरीही आत्तापर्यंत केवळ 37 कोटी 24 लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली आहे.