मुंबई : मानसिक स्थिती ठीक नसलेल्या आईसोबत चार वर्षाची चिमुरडी बाजारात गेली. मात्र घरी फक्त आईच आली. मुलगी घरी परतलीच नाही. मात्र पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवल्यामुळे अपहरण झालेल्या मुलीच्या जीवाला असलेला संभाव्य धोका टळला. मुलीची आई मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्यामुळे मुलीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. तथापि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करीत मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले. याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे मानखुर्द आणि परिसरात कौतुक केले जात आहे. असाह्य महिलेचा गैरफायदा घेत तिच्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत मुलीच्या मामाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 36 तासांच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा थांगपत्ता लावला आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका केली.
अवघ्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे मुलीचा शोध कसा घ्यायचा, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. मुलीच्या आईकडून माहिती मिळवण्याची मोठे कसरत पोलिसांना करावी लागली होती. महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ती पोलिसांना योग्य प्रकारे उत्तरेही देत नव्हती. तसेच मुलीचा अलीकडचा फोटो देण्यासही तिने नकार दिला होता. अशा परिस्थितीत मुलीचा चेहरा आणि तिची ओळख कशी पटवायची, याची चिंता पोलिसांना होती. मात्र मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने हे आव्हान देखील लीलया पेलले.
क्राइम ब्रांच युनिट सहाच्या पथकाने मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्या फुटेजमध्ये देखील मुलीचा कुठेही ठावठिकाण लागला नाही. याच दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांना माहिती देण्यात आली. तसेच शहरातील बालसुधारगृहांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली. याच दरम्यान मानखुर्द येथील श्रद्धानंद बालसुधारगृहाच्या आवारात एका लहान मुलीला अज्ञात व्यक्तीने सोडून दिल्याची माहिती मिळाली. तेथे क्राईम ब्रांचचे पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या मुलीची ओळख पटवली. त्यानंतर संबंधित मुलीचा ताबा तिच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. अवघ्या 36 तासांच्या आत मुलीचा शोध घेण्यात क्राईम ब्रँच मिळवल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.