मुंबई : भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुती गृहामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुले रडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचे घृणास्पद काम रुग्णालयातील परिचारिकांकडून केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील एनआयसीयु युनिटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बालकाच्या मातेने भाजपत्या माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. यानंतर जागृती पाटील यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत प्रकरणाचा जाब विचारला. रुग्णालया प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
सावित्रीबाई फुले रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे यांची प्रसुती झाली होती. बाळाला कावीळ झाली असल्यामुळे त्याला एनआयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. बाळाला पाहण्यासाठी जेव्हा प्रिया या एनआयसी युनिटमध्ये आल्या. त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी तिथल्या परिचारिकांना विचारलं असता बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जात असल्याचा खुलासा केला.
बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याप्रकरणी एनआयसी युनिटमध्ये कार्यरत असलेल्या सविता भोईर या परिचारिकेला निलंबित केलं आहे. तसेच एका परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये एनआयसीयु युनिटमध्ये ठेवण्यात आलेली नवजात मुले दगावल्याची घटना समोर आली होती. परंतु तरी देखील रुग्णालय प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसते.