मानखुर्द : दोन कुटुंबात झालेल्या वादातून शेजाऱ्याने शेजारणीवर गोळी झाडल्याची घटना मानखुर्द येथील इंदिरा नगर परिसरात घडली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. फरजाना इरफान शेख असे हत्या करण्यात आलेल्या 31 वर्षीय महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे, तर एक महिला आरोपी फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतिश सिंग आणि सोनू सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते दोघेही पिता-पुत्र आहेत. तर शिल्पा सिंग ही फरार आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये खून आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिता-पुत्राची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रामनवमीनंतर दोन दिवसांनी फरजाना शेख हिने मानखुर्द पोलिसात सोनू सिंगचा मुलगा आदित्य सिंग याने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला, परंतु प्रकरण अद्याप तपासाधीन असल्याने कोणालाही अटक झाली नाही. यानंतर आदित्य देखील फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
शनिवारी सकाळी फरजाना या प्रकरणाची सद्यस्थिती विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी आरोपी शिल्पाने तिला पाहिले. फरजाना आदित्यला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या भीतीने सोनू सिंग आणि आतिश हे चॉपर आणि पिस्तुल घेऊन तिच्या घरी गेले. यानंतर आतिशने महिलेवर गोळी झाडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले.
पोलिसांनी 10 विशेष पथके तयार करून शनिवारी रात्री उशिरा शोध सुरू केला. ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि कोकण परिसरात पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. अखेर रत्नागिरीतून पिता-पुत्राला अटक करण्यात आली. आदित्यवर बलात्काराच्या आरोपांव्यतिरिक्त, कुटुंबावर खंडणी, वीजचोरी, खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला असे अनेक गुन्हे मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र कोणत्याही प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे कुटुंब मानखुर्द येथे राहत होते. परंतु फरजानाने आदित्य सिंगवर बलात्काराचा आरोप लावल्यानंतर ते नवी मुंबईत आले. घटनेच्या दिवशी ते मानखुर्द येथे वैयक्तिक कामानिमित्त आले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये विविध कारणांवरून वारंवार भांडणे होत होती.