मुंबई : मुंबईत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धावत्या लोकलमध्येच एका नराधमाने तरुणीची अब्रू लुटल्याची घटना बुधवारी घडली. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान ही गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. अटक आरोपी हा रोजंदारी कामगार आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर 20 वर्षीय तरुणी गिरगाव परिसरातील रहिवासी असून, ती नवी मुंबईतील बेलापूर येथे बुधवारी परीक्षा देण्यासाठी चालली होती. यासाठी तिने सकाळी सीएसएमटी येथून हार्बर लोकल पकडली. डब्यात कुणीच नव्हते. यावेळी आरोपी महिला डब्यात शिरला. तरुणी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीने सकाळी 7:26 च्या सुमारास सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरुणीने लोकलमधील अलार्म वाजवताच आरोपी मस्जिद स्टेशनवर उतरला. तरुणीने जीआरपीकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध या गुन्हा नोंदवण्यात आला. जीआरपी आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)च्या पथकांनी मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याची ओळख पटली आणि दुपारी 4 वाजता त्याला पकडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.