मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : सामान्य, निष्पाप नागरिकांशी गोड बोलून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्या वाढली आहे. अशीच एका सायबर फ्रॉडची घटना उघडकीस आली होती. त्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. सतत सात महिने पाठपुरावा केल्यानंतर सायबर फ्रॉड (cyber fraud) प्रकरणातील संशयिताला अटक केली आहे. या काळात आरोपी फरार होता.
एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या आणि अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या २९ वर्षीय पीडित इसमाची आरोपींने ६०,००० रुपयांची फसवणूक केली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत आरोपीने ऑनलाइन पॉलिसी आणि कर्जाच्या ऑफरच्या नावाखाली तक्रारदाराची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. किरण माने (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
खोटा दावा करून केली फसवणूक
फेब्रुवारी 2023 मध्ये , पीडित इसमाला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. आपण बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा खोटा दावा कॉलरने केला.
खोटं बोलणाऱ्या त्या तोतयाने पीडित इसमाला कर्जाची ऑफर दिली आणि काही इन्श्युरन्स पॉलिसींची शिफारसही केली. पॉलिसी मिळाल्यास कर्ज मंजूरीची हमी मिळेल, असे आश्वसन पीडित इसमाला देण्यात आले. त्यानंतर त्याला एका विशिष्ट बँक खात्यात निधी ट्रान्स्फर करण्याची सूचनाही देण्यात आली. पीडित इसमाने या सूचनांचे पालन करत पैसे पाठवले.
मात्र काही दिवसांनी त्या कॉलरने पीडत इसमाला पुन्हा फोन केला आणि तुमची आई सीनिअर कॅटॅगरीत येत असल्याने अतिरिक्त पॉलिसी खरेदी करावे लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित इसमाने 60 हजार रुपये त्याला ट्रान्स्फर केले.
कर्जाच्या रकमेबाबत जे वचन दिले होते, त्याबद्दल शंका निर्मा झाल्यानंतर पीडित इसमाने त्या कॉलरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने टाळाटाळ करत असंबंद्ध उत्तरे देण्यास सुरूवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे पीडित इसमाच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर अंधेरी पोलिसांकडून सतत सात महिने गुन्हेगाराचा शोध घेण्यात आला. अखेरट त्याला अटक करण्यात यश मिळाले. पण दुसरा साथीदार अद्यापही फरार आहे.