Mumbai Crime : फूड डिलीव्हरीसाठी आले पण फोन उचलून पसार झाले, कसे उलगडले चोरीचे रहस्य ?

| Updated on: Oct 21, 2023 | 9:24 AM

नेमण्यात आलेल्या डिलीव्हरी एजंट्सची पार्श्वभूमी फूड डिलीव्हरी ॲपद्वारे तपासली जाते की नाही, असा प्रश्न या घटनांवरून उपस्थित होत आहे. मेहनतीने कमावलेले पैसे साठवून घेण्यात आलेला मोबाईल चोरीला गेल्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करवा लागत आहे.

Mumbai Crime : फूड डिलीव्हरीसाठी आले पण फोन उचलून पसार झाले, कसे उलगडले चोरीचे रहस्य ?
Follow us on

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : गेल्या काही दिवसांत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत ज्यामध्ये फूड डिलीव्हरी ॲपसाठी काम करणारे डिलीव्हरी एजंट्स फोन चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रात्रीच्या वेळी सोसायटीच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाचे लक्ष नसताना किंवा ते थोडा वेळ विश्रांती घेत असताना या डिलीव्हरी एंजट्सनी त्यांचा कार्यभाग साधत फोन चोरले. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून स्विगी आणि झोमॅटो सारखी फूड डिलीव्हरी ॲप कंपन्या त्यांच्या एजंट्सची पार्श्वभूमी नीट तपासतात की नाही हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण त्यांना सोसायटीमध्ये आणि पर्यायाने लोकांच्या घरापर्यंत सहज प्रवेश मिळतो.

चोरीच्या या दोन्ही घटनांपैकी पहिली ही कलिनातील गोल्डन रॉक सोसायटीमध्ये तर दुसरी चोरी ही कांदिवलीच्या चारकोप भागातील सेक्टर 8 मध्ये घडल्याचे समोर आले. दोन्ही घटनांमध्ये डिलीव्हरी एजंट्सनी त्यांची वाहने सोसायटीच्या गेटच्या बाहेर पार्क केली होती.

सहा महिने पैसे साठवून विकत घेतलेला मोबाईल क्षणात गायब

यापैकी पहिली चोरी ही 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजता गोल्डन रॉक सोसायटीत घडली. गेल्या तीन वर्षांपासून तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक रमेशकुमार मंडल यांचा मोबाईल अज्ञात स्विगी डिलिव्हरी बॉयने चोरून नेला. मंडल यांच्या सांगण्यानुसार, डिलीव्हरी बॉय त्याच्या सायकलवर आला होता. चोरीपूर्वी सायकल त्याने सोसायटीच्या गेटच्या बाहेर पार्क केली. त्यानंतर त्याने ( सुरक्षारक्षकाच्या) केबिनमधून फोन चोरला. मंडल यांनी गेले सहा महिने पै न् पै साठवून 5 ऑक्टोबर रोजी 14,000 रुपये किमतीचा नवीन मोबाइल फोन विकत घेतला. तो हरवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली पण फोन कुठेच सापडला नाही. अखेर त्यांनी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्यासह सोसायटीच्या सदस्यांना या चोरीबाबत कळवले. त्यानंतर त्या सर्वांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा निर्णय घेतला.

स्विगी कंपनीचा टी-शर्ट घातलेला एक डिलीव्हरी बॉय सोसायटीत घुसला आणि केबिनमधून गार्डचा मोबाईल चोरला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले. त्यानंतर मंडल यांनी ताबडतोब त्यांच्या सुरक्षा एजन्सीशी संपर्क साधला आणि त्यांनी स्विगी अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. 24 तासांच्या आत हे प्रकरण सोडवतील असे आश्वासन स्विगीने माझ्या बॉसला आश्वासन दिले, पण आता इतके दिवस उलटूनही चोराचा काहीच पत्ता लागलेला नाही. माझा मोबाईलही गेल्यात जमा आहे. सहा महिन्यांची माझी संपूर्ण बचत मी गमावली, असे मंडल म्हणाले.

मध्यरात्री घडला गुन्हा

चोरीचा असाच प्रकार यापूर्वी कांदिवलीच्या चारकोप भागातील हिल व्ह्यू सोसायटीत घडला. झोमॅटो कंपनीसाठी डिलीव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 22 सप्टेंबर रोजी सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरला आणि तो पसार झाला. हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. या घटनेबद्दल सोसायटीचे सदस्य प्रवीण राठोड यांनी माहिती दिली “आमच्या भागात झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला होता. पहाटे ३ च्या सुमारास सोसायटीने नेमलेला सुरक्षा रक्षक राऊंडवर गेला होता. तो जागेवर नसल्याचा फायदा डिलीव्हरी बॉयने त्याचा मोबाईल चोरला. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकाकडे एकही फोन नाही, त्यामुळे सोसायटीचे सदस्य या नात्याने, आम्ही त्याच्या सुरक्षा एजन्सीला त्या एक नवीन मोबाइल फोन उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. सोसायटीचे सदस्ही स्वखर्चाने त्याला एक फोन देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संतोष पटनाईक यांनी त्यांचा फोन गमावला. याबद्दल त्यांनीही माहिती दिली. मोबाईल चार्जिंगला लावून मी सोसायटीच्या आवारात एका राऊंड मारत होता. मात्र मी परत आलो तेव्हा माझा पोन जागेवर नव्हता. मी खूप सोधाशोध केली पण फोन काही सापडला नाही. 15 हजार रुपये खर्च करून मी तो फोन विकत घेतला पण आता तो गमावला. मी आता हतबल आहे. याप्रकरणासाठी कंपनीच जबाबदार आहे. त्यांन एकतर फोन परत मिळवून द्यावा नाहीतर मला नुकसान भरपाई तरी द्यावी, असे पटनाईक म्हणाले.