मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक वृद्धे गुन्च्या अपघाती मृत्यूचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. त्या वृद्धेचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. अपघात होऊनही तो लपवत नैसर्गिक मृत्यू (natural death) झाल्याचे भासवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी गुन्ह्याचा (crime news) छडा लावलाच. 10 सप्टेंबर रोजी एक 43 वर्षांचा इसम पुष्पा केणी या 73 वर्षांच्या वृद्धेला सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. ही महिला आपल्या गाडीसमोर चक्कर येऊन पडली आणि आपण कसं चांगलं कार्य करत तिला लगोलग रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन आलो, याच त्या इसमाने यथोचित वर्णनही केलं.
सायनमधील भंडारवाडा येथील रहिवासी असलेल्या पुष्पा केणी या त्यांच्या घरी परत जात असताना हा अपघात घडला. त्यांचा मुलगा प्रशांत ( वय 56) याने दिलेल्या माहितीनुसार, दर एकादशीला त्यांची आई चालत मंदिरात जायची. या घटनेच्या दिवशीदेखील त्या दुपारी ३ वाजता त्या घरातून देवळात जायला निघाल्या, मात्र अवघ्या अर्ध्या तासातच त्यांच्या कुटुंबियांना त्या रस्त्यावर एका कारसमोर पडल्याचा फोन आला. कारचा ड्रायव्हर इस्माइल अन्सारीने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचेही कुटुंबियांना सांगण्यात आले.
मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच केणी यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कारचालक अन्सारी याचे केणी यांच्या शोकाकुल कुटुंबियांनी आभार मानले. तसेच त्यांनी पोलिसांत कोणतीही केसही दाखल केली नाही.
सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला उलगडा
मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. केणी यांचे कुटुंबिय पोलिसांकडे आले नाही. पण पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण यांनी अपघाताच्या दिवशीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये जे दृश्य दिसले ते पाहून त्यांना धक्का बसला. केणी या रस्ता ओलांडत असतानाच अन्सारी यांच्या भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना उडवल्याचे त्यामध्ये स्पष्टपणे दिसत होता. कारच्या धडकेने केणी रस्त्यावर कोसळल्या, त्यानंतर अन्सारीने धाव घेतत्यांना कारमध्ये बसवल्याचेही या फुटेजमध्ये दिसत होते.
अन्सारी याच्या कारच्या धडकेनेच केणी यांचा अपघात झाल्याचे स्पष्ट होताच, 16 सप्टेंबर रोजी पोलिसांनी प्रशांत केणी यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पोलिस स्थानकात बोलावले आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवले. मात्र त्यानंतरही प्रशांत याने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही अन्सारी याला अटक केली, असे पोलिसांनी नमूद केले.
सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.