मुंबई : सीबीआय अधिकारी आणि ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत रिअल इस्टेट एजंट आणि डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. टोळीने अलीकडेच छत्तीसगडमधील एका राईस मिल मालकाच्या कार्यालयावर 27 जून रोजी आणखी बनावट छापा टाकला. ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करत आरोपींनी 2 कोटी रुपये लुटले. राईस मिल मालकाने घरच्यांच्या मदतीने टोळीतील एकाला पकडण्यात यश मिळविले, तर इतर फरार झाले. मोहन नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आता सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर घेत आहेत. या घटनेप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एसपी वैभव बनकर आणि अतिरिक्त एसपी संजय ध्रु या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी तपासाची धुरा हाती घेतली. पोलिसांनी गुगलवर अशाच पद्धतीच्या गुन्ह्याचा शोध घेतला असता, गोरेगाव पोलिसांनी अटक केलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्यांच्या बातम्या त्यांच्या समोर आल्या. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा वापर करून त्यांनी गुन्हेगारांची ओळख पटवली.
गोरेगाव पोलिसांच्या मदतीने त्यांनी मुंब्य्रातील अनेक ठिकाणी छापे टाकले. परिणामी ग्रिश वालेचा, हमीद खान, जिवा आहेर नासिर खान, मंगल पटेल, किशोर चौबल, नजीर उर्फ सुनील, श्रीधर पिल्लई उर्फ अब्दुल हमीद सय्यद आणि विजय गायकवाड उर्फ संजय अहिरे यांना अटक करण्यात आली. चौकशीत ग्रिश वालेचा आणि हमीद खान हे टोळीचे सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सेबी (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) कडून 20 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही वालेचा वाँटेड आरोपी होता आणि अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती.
छत्तीसगड पोलिसांनी गोरेगाव पोलिसांच्या मदतीने आठ जणांना अटक केली, त्यापैकी दोन गोरेगाव प्रकरणातही हवे होते. गेल्या वर्षी अशाच प्रकारे फसवणुकीची घटना गोरेगावमध्ये घडली होती. सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत एका रिअल इस्टेट एजंटला 1.6 कोटी रुपयांचा गंडा आरोपींनी घातला होता. या कारवाईनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या घोटाळ्यांना बळी पडू नयेत यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत, असे फणसळकर म्हणाले.