Hema Updhyay Murder case : हेमा उपाध्याय हत्याप्रकरणी चिंतन उपाध्यायसह अन्य आरोपींना जन्मठेप

| Updated on: Oct 10, 2023 | 4:16 PM

Chintan Upadhyay : चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एसवाय भोसले यांनी शिवकुमार राजभर, प्रदिप कुमार राजभर आणि विजय कुमार राजभर या तिघांनाही हेमा आणि तिचे वकील हरीश भंभानी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Hema Updhyay Murder case :  हेमा उपाध्याय हत्याप्रकरणी चिंतन उपाध्यायसह अन्य आरोपींना जन्मठेप
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय (hema upadhyay murder case) आणि वकील हरीश भंबानी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी चिंतन उपाध्याय (chintan updhyay) याला सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली. डिसेंबर 2015 हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरीश यांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन याच्यासह आणखी तिघांना दिलासा देण्यास नकार देत जन्मठेप ठोठावली. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

न्यायाधीशांनी चिंतन याच्याव्यतिरिक्त शिवकुमार राजभर, प्रदिप कुमार राजभर आणि विजय कुमार राजभर यांनाही त्या दोघांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चिंतन हा हेमा यांचा पती होता. त्यानेच इतर साथीदारांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली होती असं तपासामध्ये उघड झालं होतं. अखेर आज याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण ?

विख्यात शिल्पकार आणि फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा उपाध्याय आणि चिंतन यांच्या घटस्फोटाचा खटला 2015 साली सुरू होता. मात्र डिसेंबर 2015 मध्ये हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश यांचे मृतदेह एका कार्डबोर्ड बॉक्स मध्ये भरून कांदिवली येथील एका नाल्यात फेकून दिल्याचे आढळले होते. या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ माजली होती.

या दुहेरी हत्याकांडाचा तपास झोन 11 चे तत्कालीन डीसीपी विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. हेमा यांचा पती चिंतन यानेच मारेकऱ्यांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पुरावे पोलिसांनी सादर केले. याप्रकरणी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध खटला सुरू होता. त्याने सहा वर्ष तुरूंगात घालवली. मुंबई सत्र न्यायालय तसेच हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अखेर 2021 साली चिंतन याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्याकांडातील मुख्य मारेकरी विद्याधर राजभर हा अद्यापही फरार आहे.

हेमा उपाध्याय व हरीश यांच्या हत्येसाठी प्रवृत्त करणे तसेच हत्येचा कट रचल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात न्यायालयाने चिंतन याला दोषी ठरवले होते. तर प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभर या तिघांना हत्या, हत्येचा कट रचणे आणि हत्या केल्याचे पुरावे नष्ट करणे, या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले होते. याप्रकरणी सरकारी वकिलांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. अखेर मंगळवारी याप्रकरणी न्यायालयाने चिंतन व इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.