मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटे पालघरजवळ गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. या गोळीबार प्रकरणी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी चेतन आणि मयत एएसआय टीकाराम यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मीडियाशी संवाद साधताना आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिन्हा यांनी कॉन्स्टेबल आणि एएसआयमध्ये कोणताही वाद झाला नसून, चेतन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले.
कॉन्स्टेबल चेतन हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. नुकताच तो सुट्टीवरुन परतला होता. चेतन आणि एएसआय टीकाराम यांच्यात कोणतेही भांडण झाले नाही. डिप्रेशनमधून त्याने जो समोर दिसला त्याच्यावर त्याने गोळीबार केला. आरोपी चेतन थोडा रागीट स्वभावाचा आहे आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते, याच कारणातून ही घटना असे, आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिन्हा यांनी स्पष्ट केले. आरोपीची अद्याप चौकशी सुरु आहे. चौकशीत आणखी काय काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोरिवली जीआरपी पोलीस ठाण्यात आरोपी आणि इतरांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आरोपी चेतन कुमार याची चौकशी करून जबाब नोंदवण्यात येत आहे. आरोपीसोबत कर्तव्यावर असणाऱ्या आणखी दोन आरपीएफच्या दोन कर्मचाऱ्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. हेडकॉन्स्टेबल नरेंद्र आणि अमय यांचेही जबाब नोंदवले जात आहेत. तसेच रेल्वेच्या डब्यात उपस्थित असणाऱ्या आणखी काही जणांचे जबाबही पोलीस नोंदवणार आहेत.