मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ट्रेड वर्ल्ड टॉवरमध्ये चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट खाली कोसळली. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एका जखमीला केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करुन त्यांनी घरी सोडण्यात आले. सर्व जखमी 20 ते 48 वर्षे वयोगटातील आहेत. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रियांका चव्हाण, प्रतीक शिंदे, अमित शिंदे, मोह. रशीद, प्रियांका पाटील, सुधीर सहारे, मयूर गोरे, तृप्ती कुबल अशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमींची नावे आहेत. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. किरण विश्वनाथ चौकेकर यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. लोअर परळमधील कमला मिल्स कंपाऊमडमध्ये ही जी प्लस 16 माळ्यांची टॉवर आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट झाली बेसमेंटवर कोसळली. यात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाण्यातील कळवा परिसरातील खारेगाव येथे साई दीप इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सदर इमारत ही धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या इमारतीत कुटुंब राहत होते, मात्र सदर घटनेमुळे कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्यांची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 67 मध्ये करण्यात आली आहे.