नालासोपारा | 16 ऑक्टोबर 2023 : आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळतं. आई नऊ महिने भार सोसून, प्राणांतिक वेदना सोसून बाळाला जन्म देते. त्याच मुलाला किंवा मुलीला मोठं करण्यासाठी, सुखी आयुष्य देण्यासाठी आई-वडील सर्वस्व पणाला लावतात. पण एखादं दिवशी भावनेच्या भरात, किंवा समोरील आव्हानांना घाबरून, त्रासाला कंटाळून असं पाऊल उचललं जातं, ज्याने ती व्यक्ती तर जाते पण मागच्या माणसांच्या दु:खाला पारावार उरत नाही. एकदाच मिळालेलं आयुष्यं असं वाऱ्यावर उधळण्यापेक्षा , आहे त्या आव्हानांचा, संकटांचा सामना करणं कधीही उत्तम. जीव देण्यापेक्षा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही देशातील लोकांसमोरच्या काही समस्याही, काही कुप्रथा अजूनही कायम आहे. हुंड्याची मागणी ही त्यापैकीच एक. मुलीच्या माहेरून तिला पैसे, गाडी, सगळं आणण्यासाठी दबाव टाकला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यापायी अनेकींची आयुष्य संपली, उद्ध्वस्त झाली.
हुंड्याच्या मागणीपायी छळ सहन करत राहिलेल्या आणखी एका विवाहीत महिलेने अखेर या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना राज्यात घडली. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून नालासोपाऱ्यात एका 22 वर्षीय विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं.
एका क्षणात घेतला निर्णय पण त्यापूर्वी..
संगिता असे मृत महिलेचे नाव असून आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी तिने तिच्या हातावर सर्व हकीकत लिहून ठेवली. आपल्या या कृत्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावंही तिने यामध्ये नमूद केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मे 2022 मध्ये संगीता हिचा विवाह नितेशकुमार याच्याशी झाला. उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी तिच्या आई-वडिलांकडून हुंडा, मोटारसायकल आणि संसार उपयोगी साहित्य देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली.
मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली. नवरा, सासू, सासरे आणि नणंद यांनी तिला हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यास सुरवात केली. याबद्दल तिने तिच्या माहेरच्यांना कल्पना दिली होती. मात्र आपल्या मुलीचा संसार तुटू नये यासाठी आपसात चर्चा करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू होता.
पण तरीही तिचा छळ थांबला नाही. या सर्व गोष्टींना तसेच सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून, तिने तिच्या सर्व वेदना आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्यांबद्दल हातावर लिहून ठेवलं आणि जीवन संपवलं.
मुलीच्या या कृत्यामुळे तिच्या आई-वडिलांवर, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांच्या विरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.