मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : माणसाचं मन खूप विचित्र, गुंतागुंतीचं आहे. वरवर माणूस कितीही हसतमुख दिसत असला तरी आतमध्ये तसंच असेल नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता, कधीकधी त्यांच्या जवळच्या माणसांनाही लागत नाही. सगळं छान, आलबेल सुरू आहे असं जगाला दिसत असतं पण मनात आतमध्ये विचारांची वादळं उठत असतात. कधीकधी या विचारांनी नको-नको होतं पण शेवटी काय विचार करायचा हेही हातात नसतं. मनाच्या गुतांगुतीमुळे एका क्षणी अशी काही कृती होऊन बसते, ज्याचा नंतर संदर्भ लागतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.
मनाच्या अशाच आंदोलनांचा फटका मुंबईमध्ये एका महिलेला बसला, जिने भावनेच्या भरात एक कृती केली खरी पण त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं. मुलुंडमध्ये ही धक्कादायक (mulund crime) घटना घडली आहे. तेथे एका महिलेने तिच्या अवघ्या महिन्याभराच्या (३९ दिवस) मुलीला इमारतीतील १४ व्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये त्या चिमुकलीचा करूण अंत झाला आहे. १४ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बेडरूममधून खाली फेकल्यावर ती मुलगी एका दुकानाच्या छतावर पडली. सकाळी समोरच्या इमारतीमधील इसमाने तिचा मृतदेह पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेस जबाबदार असलेली महिला सध्या डिप्रेशनवर उपचार घेत असून मुलंड पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील नीळकंठ तीर्थ या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली असून मनाली मेहता असे आरोपी महिलेचे नाव आहे. लग्नानंतर सूरत येथे राहणाऱ्या मनालीने ३९ दिवसांपूर्वीच एक गोड मुलीला जन्म दिला होता. काही दिवसांपूर्वी ती मुलंड येथे आई-वडिलांच्या घरी रहायला आली होती. गुरूवारी पहाटेच्या सुमारास मनाली हिने तिची लेक, हाश्वी मेहता हिला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले. फेकल्यानंतर ती चिमुकली योगेश इमारतीत असलेल्या एका फोटो स्टुडिओच्या छतावर जाऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांवी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
वडिलांच्या निधनामुळे आले होते नैराश्य
दोन महिन्यांपूर्वीच मनालीच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यामुळेच ती गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. तिच्या कुटुंबियांसमोरच ती, तिची मुलगी हाश्वी हिच्याशी गप्पा मारायची. ‘आजोबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते तुला बोलावत आहेत’ असं तेव्हा ती अनेकवेळा म्हणायची. हे सर्व बुधवार रात्रीपर्यंत सुरू होतं, मात्र त्याचा असा अर्थ निघेल आणि ती अशी धक्कादायक कृती करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
पहाटेच्या सुमारास खिडकी उघडली आणि..
बुधवारी रात्री तिची आई, भाऊ आणि वहिनी सगळे गाढ झोपले. गुरूवारी पहाटे ४ च्या सुमारास मनाली तिच्या बेडरूमची खिडकी उघडली आणि तिच्या पोटच्या लेकीला, हाश्वीला खआली फेकले. समोरच्या इमारतीत असलेल्या फोटो स्टुडिओच्या छतावर हाश्वी कोसळली. सकाळी ८ च्या सुमारास त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका इसमाने खिडकी उघडली असता फोटो स्टुडिओच्या छतावर लहान बाळाचा मृतदेह दिसला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी लगेच पोलिसांना फोन करू या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तपास केला असता ते बाळ म्हणजे मनाली हिचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.
“आम्हाला मनाली तिच्या घरी सापडली, ती अत्यंत व्यथित अवस्थेत होती. तिच्या अस्थिर मानसिक स्थितीमुळे आम्ही अद्याप तिला (आरोपी आईला) अद्याप अटक केलेली नाही. तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत, ” असे पोलिसांनी सांगितले.