मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. मुंबई, दिल्लीसारख्या शहरातही महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. शेजाऱ्याने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने पतीसह पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कलम 376 (बलात्कार), 354A (लैंगिक छळ), 354B, 354C (व्हॉय्युरिझम), 354 सी, 509, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी 22 मार्च 2022 रोजी महिलेचा कामावर गेला असता ती एकटी असल्याची संधी साधत आरोपी तिच्या घरी आला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तीन दिवसांनंतर, त्याने महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या पतीला बलात्काराच्या घटनेची माहिती देण्याची धमकी देऊन तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेचे व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट घेतले. मे महिन्यात, त्याने हे अश्लील फोटो त्याच्या मित्राला दाखवले. तो ही त्याच्या शेजारीच राहत होता. नंतर त्या दोघांनी पतीला फोटो दाखवण्याची धमकी देत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला.
महिलेसोबत घडत असलेल्या या प्रकारामुळे ती सतत चिंतेत असायची. पतीला तिची बदलेली वागणूक लक्षात आली. पतीने तिला विश्वासात घेत तिच्या चिंतेचे कारण विचारले. यानंतर महिलेने वर्षभरापासून सुरु असलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. यानंतर पतीने महिलेसोबत थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली.
मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय अहवालातही महिलेसोबत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधील सर्व व्हिडिओ, फोटो आणि मॅसेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपपत्रासाठी तांत्रिक तपासाचा भाग म्हणून पुरावे फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत.