मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : सध्या ऑनलाइन फ्रॉड किंवा सायबर फ्रॉडच्या (cyber fraud) अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशाच एक ऑनलाइन फ्रॉडचा फटका एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांना बसला. निवृत्त अधिकारी असलेले ज्ञानदेव वानखेडे यांनी या फ्रॉडमुळे हजारो रुपये गमावल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन लिंकवरून ड्रायफ्रूट्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची ही फसवणूक झाली आणि त्यांना सुमारे 30 हजार रुपये गमवावे लागले. फसवणूक करणार्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये असलेल्या ड्रायफ्रुट्स स्टोअरसाठी बनावट वेबसाइट तयार केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि आयआरएसचे (IRS) अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांचे वडील, अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे सासरे, ज्ञानदेव वानखेडे हे एक निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या झालेल्या फसवणुकीनंतर ओशिवरा पोलिसांनी, अजित बोरा आणि वाशी येथील एपीएमसी येथे असलेल्या ” मॅप ऑफ ओम मंगलम ड्राय फ्रूट्स” या दुकानाचे नाव वापरून बनावट वेबसाइट तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
जाहिरात पाहून कॉल केला आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी ज्ञानदेव वानखेडे यांना फेसबुकवर ड्रायफ्रुट्ची जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये मोबाईल क्रमांकासह ‘मॅप ऑफ ओम मंगलम ड्राय फ्रूट्स’ आणि ‘अजित बोरा’ ही नावं होती. कथित फसवणूक करणाऱ्याने वाशी येथील नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटचा पत्ताही त्या जाहिरातीमध्ये दिला होता.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ” वानखेडे यांना ड्रायफ्रुट्स मागवायचे होते, म्हणून त्यांनी फेसबूकवरील जाहिरात पाहून, त्या वेबसाईटवर जाऊन तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर वानखेडे यांनी 2,000 रुपये किमतीचे बदाम, काजू, सुके अंजीर आणि अक्रोड यांची ऑर्डर देत त्या कथित दुकानदाराला UPI द्वारे पैसे पाठवले.” मात्र काही मिनिटांनंतर, फसवणूक करणार्या व्यक्तीने वानखेडे यांना कॉल केला आणि सांगितले की त्यांचे पार्सल तयार आहे परंतु जीएसटी समस्यांमुळे ते लॉक केले गेले आहे. त्या भामट्याने वानखेडे यांना ते पार्सल अनब्लॉक करण्याची विनंती केली. मात्र यामुळे वैतागलेल्या वानखेडे यांनी आपल्याला त्या ड्रायफ्रुट्सची गरज नसल्याचे सांगत त्या इसमाकडून पैसे (refund) मागितला.
अशी झाली फसवणूक
बँकेच्या सर्व्हरची समस्या असल्याने आपण पैसे परत पाठवू शकत नसल्याचा दावा त्या भामट्याने केला. त्यानंतर त्यांनी वानखेडे यांना ठरावासाठी एक रुपया पाठवण्यास सांगितले. दरम्यान, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने वानखेडे यांना गुगल प्ले उघडून दिलेला कोड टाकण्याची सूचना केली. त्यांच्याशी बोलता बोलता फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने वानखेडे यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना एक कोड एंटर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वानखेडे यांनी तो कोड सबमिट केला.
मात्र त्यानंतर थोड्याच वेळात, वानखेडे यांच्या बँक खात्यातून पैसे डेबिट होण्यास सुरूवात झाली आणि एकूण ३० हजार रुपये कट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वानखेडे यांनी तत्काळ या घटनेची माहिती ओशिवरा पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला. ” आरोपी अजित बोराविरुद्ध आयपीसी कलम ४१९ आणि ४२० तसेच आयटी कायद्यानुसार एफआयआर दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.