मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुंगीचं औषध पाजून आपल्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून जबरदस्ती पैसे उकळल्याचा आरोप पीडितेने लावला होता.
रिपोर्ट्सनुसार, पीडित महिलेने गेल्या आठवड्याच दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती. ताडदेव भागात बॅडमिंटन सेशनदरम्यान आपली आरोपीशी ओळख झाल्याचे पीडितेने नमूद केले. त्यानंतर दोघांमध्येही चांगली मैत्री झाली.
आधी मैत्री मग केली फसवणूक
त्यावेळी पीडित महिलेचे तिच्या पतीश वाद सुरू होते, त्यामुळे ते दोघेही वेगळे रहात होते. आरोपीने महिलेशी मैत्री केली आणि तिच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेण्यास सुरूवात केली. पतीसोबत सुरू असलेला वाद मिटवण्याचे आश्वासनही आरोपीने दिले. त्याच मुद्यावर बोलण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी त्याने पीडितेला मरीन ड्राइव्ह येथील एका क्लबमध्ये बोलावले. मात्र तिथे त्याने तिच्या ड्रिंकमध्ये गुंगीच औषध मिसळलं. नंतर तो त्या महिलेसोबत कारमधून तिच्या घरी गेला, तिथे दोघांनीही थोडं आणखी मद्यपान केलं. दारूच्या नशेत असताना आरोपीने आपलं लैंगिक शोषण केलं, असे महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केलं.
ब्लॅकमेल करून उकळले पैसे
त्यानंतर ऑक्टोबरपासून आरोपीने तिच्याकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. प्रथम तर पीडितेने त्याचे ऐकून त्याला पैसे दिले, पण नंतर हे नेहमीचंच झालं. महिलेने आरोपीला पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. आपले चॅट्स आणि व्हिडीओ तुझ्या पतीला आणि त्याच्या मित्रांना पाठवेन, असे सांगत आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
भीतीपायी त्या महिलेने आरोपीला एकूण 3.33 लाख रुपये दिले. पण त्यानंतरही त्याची पैशांची मागणी वाढू लागली. शेवटी वैतागलेल्या महिलेने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.