मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या दोन तरूणांनी नशा करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करल्याचे समोर आले आहे. चेन स्नॅचिंग करणाऱ्या (chain snatching) दुकलीला पोलिसांनी अटक ( 2 arrested) करत त्यांचा डाव उधळून लावला. नारायण राजू परमार (21) आणि आकाश विवेक सिंग (18) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर चेन स्नॅचिंग, चोरी आणि फसवणूक या तीन गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी चेन स्नॅचिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणांचा तपास डीसीपी अजयकुमार बन्सल यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत तसेच शोध पथकाच्या इतर सदस्यांनी केला. त्यांनी या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना तुरूंगात धाडले.
एक 62 वर्षीय महिला तिच्या एका मैत्रिणीसोबत एका प्रदर्शनाला गेली होती. प्रदर्शन पाहून बाहेर पडल्यानंतर आदित्य कॉलेजजवळ पार्क केलेल्या कारच्या दिशेने ती महिला परत जात असताना दोघांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि तेथून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले. याप्ररकरणाची तक्रार मिळाल्यानंतर चोरांचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे फूटेज तपासले, मात्र त्यावरून त्यांना चोरांचा कोणताही सुगावा लागला नाही.
अखेर, एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परमार या संशयिताचा शोध घेतला, ज्याला MHB पोलिसांनी यापूर्वीही चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. परमारला बारोटपाडा, बोरिवली शिंपोली येथून अटक करण्यात आली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली, तसेच यामध्ये आपला आणखी एक साथीदाराचाही, आकाश विवेक सिंग याचाही सहभाग असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे आकाश सिंग हा नुकताच 2 ऑक्टोबर रोजी 18 वर्षांचा झाला होता. आकाश आणि परमार या दोघांनी 6 ऑक्टोबर रोजी एकत्र पहिला गुन्हा केला होता.
या आरोपी दुकलीने फसवणूक आणि चोरीचा दुसरा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रस्ता विचारण्याचा बहाण करून त्यांनी 17 ऑक्टोबर रोजी बोरीवलीतील बबई नाका येथे एका 36 वर्षीय महिलेची चेन चोरली होती.
याप्रकरणातील पीडितांनी आरोपींची यशस्वी ओळख पटवली. मात्र दोन्ही आरोपाींकडून पोलिसांनी अद्याप चोरीचा मुद्देमाल हस्तगत केलेला नाही. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.