ठाणे | 13 ऑक्टोबर 2023 : आपल्या बाळाला जन्म देणं हा बहुतांश महिलांसाठी सर्वात सुखद क्षण असतो. आपलाच अंश डोळ्यांसमोर वाढताना पाहण्याचा आनंद वेगळाच. पण मुंबईत अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जी वाचून तुम्ही हादराल. एक नवमातेने तिच्या नवजात बाळासोबत जे केलं त्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. वांद्रे येथील खाडीत तान्ह्या जीवाला टाकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police) कारवाई केली आहे. बाळाला जन्म देणारी महिला आणि नवजात अर्भकाची विल्हेवाट लावण्यात मदत करणाऱ्या तिच्या साथीदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
वरळी कोळीवाडा परिसरात अंदाजे 13 ते 14 महिला एकत्र राहत होत्या. त्यापैकी, एक महिला एका हाऊसकीपिंग कंपनीत काम करत होती आणि मालकाच्या निर्देशांचे पालन करून जिथे मिळेल तिथे ती काम करायची असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना मिळाली टीप
एका गरोदर महिला प्रसूत झाली आणि तिने बाळाला खाडीत टाकून दिले अशी माहिती एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन महिलांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्यापैकी एका महिलेच्या पोटाला सूज आल्याचे समोर आले. मात्र,आपल्या पोटात दोन मोठे ट्यूमर्स असल्याने ते असं दिसत असल्याचा खुलासा त्या महिलेने केला.
असं फुटलं बिंग
महिलेने बाळाला जन्म दिला ती सोमवारी सतत बाथरूममध्ये जात होती. त्याबद्दल इतर महिलांनी तिला प्रश्न विचारले. पण माझं पोट खूप खराब आहे, असं सांगत तिने सारवासारव केली. त्यानंतर थोड्या वेळाने ती पुन्हा बाथरूममध्ये गेली आणि साधारण दोन-तीन तासांनी ती परत आली तेव्हा सुजलेलं पोटं कमी झालं होतं. असं कसं झाल्यावर तिने पुन्हा खोटंच सांगितलं. पोटात गाठ फुटली आणि त्यामुळेच रक्तस्त्राव होत असल्याचा बहाणा तिने केला. मात्र थोड्या वेळाने दुसरी एक महिला बाथरूममध्ये गेली असता सगळा उलगडा झाला. त्या महिलेला बाथरूममध्ये एक नवजात बाळ सापडलं.
त्यानंतर त्यांनी त्या महिलेची पुन्हा चौकशी केली तेव्हा आपलं बाळ मरण पावलं आहे, आणि त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही, असं ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी, एका पुरुष मित्राच्या मदतीने तिने वांद्रे येथील खाडीत नवजात अर्भकाची विल्हेवाट लावली.
याप्रकरणी ती महिला व तिच्या मित्राविरोधात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. त्या महिलेने नेमकं असं का केलं, या कृत्यामागचा हेतू काय हे शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे पोलिसांनी नमूद केले.