मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी माणूस काय किंवा प्राणी-पक्षी काय अतिशय काळजी घेत असता. त्यांना जपत असतात. आपलं बाळा सुरक्षित रहावं, त्याला काहीच त्रास होऊ नये असे प्रत्येकालाच वाटतं. मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी आई-वडील खस्ता खातात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जीवाचं रान करतात. मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात. क्षणभराचं दुलर्क्ष झालं तरी अशी एखादी घटना होऊन बसते, ज्याच्या आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.
अशीच एक दुर्दैवी घटना विरारमध्ये घडली आहे. चौथ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून खाली पडल्याने अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू (small girl) झाल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. विरार पश्चिमेच्या बचराज या 19 मजल्याच्या हाई प्रोफाइल इमारतीत काल सकाळी ही दुर्घटना घडली. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाच्या दुःखाला पारावार उरला नाही.
आई काही वेळासाठी बाहेर गेली आणि तेवढ्यात..
विरार पश्चिम येथे बचराज नावाची 19 मजली हाय प्रोफाईल इमारत आहे. तेथील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सालीयान कुटुंबीय भाड्याने राहतात. त्यांना दर्शनी नावाची एकुलती एक मुलगी होती. मिस्टर सालियान हे मुंबईत कामासाठी जातात. काल सकाळी देखील ते कामाला जाण्यासाठी निघाले. मुलगी झोपल्याने तिच्या आईने तिला घरीच ठेवले आणि ती पतीला सोडण्यासाठी स्टेशनवर गेली.
मात्र थोड्यावेळाने त्या चिमुरडीला जाग आली, ती आईला शोधू लागली पण आई घरात कुठेच दिसेना. अखेर ती बेडरुममध्ये खिडकीजवळ जाऊन वाकून पहात होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. उंचावरून पडल्याने त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिल्डरने ही 19 मजली इमारत तर बांधली पण बेडरूम च्या खिडकीला सुरक्षत्मक ग्रील बसवलेली नव्हती. त्यांनी हे काम केले नव्हते तर फ्लॅटच्या मालकांनी तरी ग्रील बसवायला हवी होती, असे मत काही लोकांनी व्यक्त केले. तर एवढ्याशा मुलीला घरी एकटीला सोडून तिचे आई-वडील बाहेर गेले नसते तर आणि खिडकीला सुरक्षात्मक लोखंडी ग्रील असती तर एका चिमुरडीचा जीव आज वाचला असता, असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
आई-वडिलांनी घेतला धाडसी निर्णय
एकुलत्या एक मुलीच्या अकस्मात मृत्यूमुळे सालियान कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वचजण शोकाकुल अवस्थेत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही सालियान कुटुंबाने समाजासाठी एक निर्णय घेतला आहे. तिच्या आई वडिलांनी एक मोठा धाडसी निर्णय घेऊन, तिचे डोळे दान केले आहेत.