मुंबई / ब्रिजभान जैस्वार-गोविंद ठाकूर : मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेली 25 वर्षे ज्या जिने इमाने इतबारे आपल्या मालकिणीची सेवा केली, घरकाम सांभाळले. तिनेच एक सोन्याची चैन आणि मोबाईलसाठी मालकिणीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा असे मयत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला अपंग असून, 25 वर्षांपूर्वी मालकिणीने तिच्यावर दया दाखवत तिला रेल्वेस्थानकावरुन घरी आणले आणि काम दिले. पण याची परतफेड मोलकरणीने ज्या पद्धतीने केली ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. पोलिसांनी महिलेसह तिला साथ देणारा तिचा पती आणि मुलगा या तिघांनाही अटक केली आहे.
मोहम्मद उमेर इब्राहिम शेख, शबनम प्रवीण ऊर्फ मोहम्मद उमेर शेख, मोहम्मद शहजाद उमेर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी मोलकरीन शबनम ही अनाथ असून, 25 वर्षापूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागत होती. डिकोस्टा यांचे स्टेशन परिसरात रोज येणे-जाणे होते. यावेळी डिकोस्टा यांनी शबनमला पाहिले अन् त्यांना अनाथ आणि अपंग असणाऱ्या शबनमवर दया आली. डिकोस्टा यांनी शबनमला आपल्या घरी आणले. आपल्या घरी तिला काम दिले. तिचे पालनपोषण केले. मग लग्नही लावून दिले.
गेली 25 वर्षे शबनम डिकोस्टा यांच्या घरी काम करत आहेत. मात्र शबनमला वाटायचे आपल्याकडे मालकिणीकडे खूप पैस आहे. या पैशासाठी ती मालकिणीचे उपकार विसरली. मालकिणीला मारुन घरातील पैसे लुटायचा तिने पती आणि मुलासोबत कट रचला. त्यानुसार डिकोस्टा यांचा नातू गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेला असताना तिने संधी साधून पती आणि मुलाच्या मदतीने मालकिणीला बाथरुममधील पाण्याच्या बादलीत बुडवून मारुन टाकले. यानंतर मालकिणीची सोन्याचा चैन, मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन पसार झाली.
डिकोस्टा यांचा नातू त्यांना फोन करत होता. मात्र आजी फोन उचलत नसल्याने त्याने शेजारी फोन करुन पहायला सांगितले. त्याप्रमाणे शेजारी डिकोस्टा यांच्या घरी पहायला गेले असता घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला.
पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शबनम आणि तिचा मुलगा घरातून बाहेर पडताना दिसले आणि एक मास्कधारी व्यक्ती घरी शिरताना दिसला. यानंतर पोलिसांनी शबनमला स्टेशन परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.