Mumbai Crime : महिलेचे अपहरण करून बेदम मारहाण, पतीच्या ‘त्या’ चुकीमुळे सहन करावी लागली शिक्षा

| Updated on: Oct 23, 2023 | 9:33 AM

चार जणांनी पीडितेला जबरदस्तीने ऑटोरिक्षात ढकलले आणि तेथून ते तिला कुर्ला येथे घेऊन गेले. मात्र तेथे गेल्यावर त्यांनी तिला बेदम मारहाण केली.

Mumbai Crime : महिलेचे अपहरण करून बेदम मारहाण, पतीच्या त्या चुकीमुळे सहन करावी लागली शिक्षा
Follow us on

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर (crime news) आली आहे. एका महिलेचे अपहरण (kidnapping and assult) करून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र यामागचे कारण जाणून तर तुम्ही हैराणच व्हाल. त्या महिलेच्या पतीच्या एका चुकीमुळे तिला हा सर्व त्रास सहन करावा लागला. तिच्या पतीने काही पैसे कर्ज म्हणून घेतले होते, मात्र उधार घेतलेले ते पैसे वेळेवर परत न केल्यामुळे काही लोकांनी त्या महिलेलाच मारहाण केल्याचे समोर आले. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता.

पीडित महिला ( वय ३२) ही चेंबूपरमधील चेड्डा नगर परिसरात राहते. तिने दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी दोन महिलांसह चार व्यक्ती थेट तिच्या घरात घुसल्या आणि त्यांनी पीडितेकडे पैशांची मागणी केली. तुझ्या पतीने आमच्याकडून पैसे घेतले आहेत, ते आता परत कर असं त्यांनी तिला सांगितलं. मात्र आत्ता आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असं पीडितेने स्पष्ट केल्यावर ते सगळे भडकले आणि त्यांनी सरळ तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित महिलेला घराबाहेर खेचून जबरदस्तीने एका रिक्षात ढकलले आणि कुर्ल्यातील बंतारा भवन येथील एका घरात नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

थेट चेहऱ्यावर केला वार

तिकडे गेल्यावर तर परिस्थिती आणखीनच बिघडली. सबा आणि आफरीन या दोन महिलांनी त्या पीडित महिलेला एका खुर्चीला करकचून बांधून ठेवले. त्यानंतर इम्रान नावाच्या इसमाने त्याच्या हातातील (धातू) कड्याने पीडित महिलेच्या चेहऱ्यावर थेट वार केला. त्या एका बुक्क्यामुळे त्या महिलेचा ओठ फाटला, ती जखमी झाली. एवढेच नव्हे तर चौथ्या इसमानेही तिला त्रास देत मारहाण केली. सबा आणि आफरीन या महिलांनी त्या महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ केली. तिच्या पतीने त्यांच्याकडून 7 हजार रुपये उधार घेतले होते, पण त्यांची परिस्थिती बिकट असल्याने तो ते पैसे परत करू शकला नाही. यामुळेच त्या चौघांनी महिलेचा अनन्वित छळ केला.

पीडितेचा पती घरी पोहोचल्यावर त्याला शेजाऱ्यांकडून त्याच्या गैरहजेरीत घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती मिळाली. त्याने त्या चौघांशी संप्रक साधत उधार घेतलेले पैसे परत केले. कारण पैसे मिळेपर्यंत पत्नीला घरी सोडणार नाही अशी धमकीच त्यांनी त्याला दिली होती.

दोघींना अटक

पीडित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. तिची बिकट अवस्था पाहून तिच्या पतीने लगेचच टिळक नगर पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सबा आणि आफरीन या दोघींना अटक तर केली पण उर्वरित दोन आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्या दोघांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या चौघांविरोधात अपहरण, मारहाण, घरात जबरदस्तीने घुसणे आणि इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले.