मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतील सायन परिसरातून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
रिपोर्ट्सनुसार, सोमवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले होते.तसेच त्याने जेजे हॉस्पिटल उडवण्याचीही धमकी दिली होती.
चुनाभट्टी येथून अटक
या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने धमकीचा कॉल करणाऱ्या त्या आरोपीचा शोध सुरू केला. अखेर बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपी कामरान याला चुनाभट्टी परिसरातून बेड्या ठोकत अटक केली. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी कामरान खान या तरुणाविरुद्ध भादंवि कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून अधिक तपासही सुरू असल्याचे समजते.
दाऊदचं सांगितलं नाव
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केलेल्या कॉलदरम्यान कामराने याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचेही नाव घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले. एवढेच नव्हे तर आपण, मुंबईतील जेजे हॉस्पिटलही उडवू, अशी धमकी देखील त्याने फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
यापूर्वीही पंतप्रधानांना मिळाली धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. काही काळापूर्वी दिल्लीतील दक्षिणपुरी भागातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला होता. आपण पंतप्रधान मोदी यांचा जीवे मारणार आहोत, अशी धमकी त्याने फोनवरून पोलिसांना दिली. त्यानंतर मोठी खळबळ माजली. पोलिसांनी तातडीने शोधमोहिम सुरू करत धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलं खरं. पण तेव्हा तो आरोपी नशेत असल्याचं आढळलं. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आत्तापर्यंत दोनदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.