मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला एक धमकीचा फोन आला आहे. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर असून हा फोनकॉल नेमका कुठून आला, तो कोणी केला याचा तपास पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. मुंबई पोलिसांना अशी धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील पोलिसांना असे अनेक फोन आले असून त्याद्वारे धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिनीनुसार, मुंबई पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा हा फोन आला. समा नावाची एक महिला एका काश्मिरी तरुणीच्या संपर्कात आहे, असी माहिती या फोनकॉल वरून देण्यात आली. तसेच ते दोघेही मिळून मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहेत, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना सांगितलं. एवढंच नव्हे तर एटीएसचे अधिकरी मला ओळखतात पण ही माहिती मी तुम्हाला देतोय असेही फोनवरून सांगण्यात आलं.
शोएब नावाच्या तरूणाने हा फोन केल्याची माहिती मिळत आहे. पण याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
यापूर्वीही आल होते धमकीचे फोन
यापूर्वीही मुंबई पोलिसांना धमकीचे असे अनेक फोन आले आहेत. ऑक्टोबर महिन्यातही पोलिसांना असा फोन आला होता. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. यामुळे यंत्रणांनी अलर्ट मोडवर जाऊस तपास करत फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला होता. यानंतर हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरु झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने दारूच्या नशेत फोन करत धमकी दिल्याचे समोर आलं.