अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई पोलीसांच्या ताडदेव पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मुंबईतील इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये मोठी कारवाई केली आहे. दोन तासाच्या नाट्यानंतर मुंबई पोलिसांना दोन रशियन यूट्यूबर्सना ताब्यात घेतले आहे. जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या दोघांना मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले असून दोघांना पोलीस ठाण्यातच ठेवले असून रशियन दूतावासाला याबाबत कळविले आहे. मुंबईमधील इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये दोन रशियन यूट्यूबर्स स्टंट करण्यासाठी गेले होते. ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समधील सुरक्षा रक्षकांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट ताडदेव पोलिसांना ही बाब कळविली होती. पोलीसांनी तात्काळ धाव घेत दोघांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र दोघेही स्टंट करत पोलिसांना चकवा देत होते. पोलीस मागे आणि ते दोघे पुढे असा तब्बल दोन तास थरार ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये सुरू होता, हा संपूर्ण थरार सुरू असतांना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.
मुंबई येथील इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये दोन रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी इमारतीत शिरले होते, इमारतीतील सुरक्षा रक्षकांच्या हे निदर्शनास येताच ताडदेव पोलिसांना माहिती दिली होती.
ताडदेव पोलीसांनी सुरक्षा रक्षकांच्या माहितीनुसार धाव घेत दोघा रशियन युट्युबर्सना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, अडीच तासांच्या प्रचंड नाट्यमय घडामोडी देखील यावेळी घडल्या आहेत.
रशियन युट्युबर्सना पकडल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परदेशी नागरिक स्टंट करताना पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील दोन वेळेला अशी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 2018 मध्ये प्रभादेवी येथे सहा परदेशी नागरिकांना पार्कर करतांना पकडण्यात आले होते.
त्यानंतर 2021 मध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर आणखी दोन रशियन नागरिक पकडले गेले होते, मुंबईत परदेशी नागरिक जीवघेणे स्टंट करतांना दिसून येत आहे.
ताडदेव पोलीसांनी अटक केलेल्या मक्सिम शचरबाकोव आणि रोमन प्रोशिन यांना पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले असून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती रशियन दूतावासाला कळविण्यात आली आहे.