चाळीसगाव | 15 जानेवारी 2024 : जळगावातील चाळीसगाव मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत पोलिस दलात कार्यरत असलेला तरूण सुट्टीसाठी गावी आला होता. मात्र ती सुट्टी त्याची अखेरची ठरली. कारण क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून त्या पोलिस तरूणावर प्राणघात हल्ला झाला आणि त्यातच त्याने जीव गमावला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. शुभम आगोने असे मृत तरूणाचे नाव असून तो चाळीसगाव शहारातील रहिवासी होता. त्याचा मृत्यूने गावात सर्वत्र हळहल व्यक्त होत असून मुलाच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सुट्टीसाठी गावी आला पण ती सुट्टी शेवटचीच..
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आगोने (वय 28) हा मूळचा चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे. तो पोलिस दलात असून सध्या मुंबीत कार्यरत होता. कामाच्या धबाडग्यातून वेळ काढून, घरच्यांना भेटण्यासाठी शुभम काही दिवसांची सुट्टी काढून नुकताच चाळीसगावला आला होता. मुलगा घरी आल्याने सगळेच आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला.
मयत तरुण हा चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे तो मुंबई येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या चाळीसगाव या गावी सुट्टीवर आला होता. रविवारी चाळीसगाव तालुक्यातील ओढर येथे क्रिकेटचे सामने झाले. त्यावेळीच शुभम याचा एका गटासोबत वाद झाला होता, रविवारी संध्याकाळी तो वाद उफाळून आला. तेव्हा चार जणांनी शुभमवर पाटणारोड येथे तलावरीने हल्ला केला.
त्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. इतर नागरिकांनी त्यावा चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत गु्न्हा दाखल केला. या खुनाप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.