मुंबई | 16 डिसेंबर 2023 : प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांना धमकीचा फोन आल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. याआधी अनेक उद्योगपती आणि बॉलीवूड हस्तींना अशा प्रकारचे धमकीचे कॉल आल्याचे उघडकीस आले होते. रतन टाटांना धमकी देणाऱ्या तरूणाने टाटांची सुरक्षा वाढविण्यात यावी अन्यथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांची जी अवस्था झाली ती होईल असा गर्भित इशारा दिल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास केला. त्यानंतर जे सत्य उघडकीस आले त्यातून वेगळीच माहीती समोर आली आहे.
याआधी अनेक उद्योगपती आणि बॉलीवूड स्टारना धमक्या आल्या आहेत. परंतू रतन टाटा यांना प्रथमच एका तरूणाने अशा प्रकारची धमकी दिल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्री यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. रतन टाटा यांना धमकी आल्यानंतर पोलिसांनी रतन टाटा यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करीत विशेष टीमची स्थापना केली. तर दुसऱ्या टीमकडे धमकीचा तपास सोपविला. कॉलरचा तपास केला असता टेलिफोन विभागाच्या मदतीने त्याचे लोकेशन कर्नाटक असल्याचे उघड झाले. तो तरूण पुण्याला राहणारा असल्याचे तपासात उघडकीस आले.
पोलिस या तरुणाच्या पुणे येथील घरात पोहचली तेव्हा फोन करणारा व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून घरातून गायब असल्याचे कळले. त्याच्या पत्नीने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या चौकशीतून हा तरुण स्क्रिझोफेनियाने त्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे. या तरूणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून रतन टाटा यांना धमकी दिली. चौकशीत या प्रकरणातील आरोपी तरूणाची मानसिक अवस्थापाहून त्याच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. विशेष या तरूणाने फायनान्समध्ये एमबीए केले आहे आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास देखील केला असल्याचे उघडकीस आले आहे.