बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी काही ना काही नवे खुलासे होत आहेतच. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहेय. या गोळीबारासंदर्भात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी होणार असून त्याची पोलिस कोठडी मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा खटाटोप सुरू आहे. याप्रकरणी राज्य सरकार केंद्रीय गृहविभागाची मदत घेणार असून त्यासंदर्भात गृहविभागाला पत्रही लिहीण्यात आलं आहे. पोलिसांना लॉरेन्सची चौकशी करायची असून त्या चौकशीतून महत्वाचे खुलासे होऊ शकतात. यासंदर्पबात गृहविभागाला पत्र पाठवण्यात आले असून केंद्रीय गृहविभागाकडून लवकरच उत्तर मिळणं अपेक्षित आहे.
१४ एप्रिल रोजी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि दोन दिवसांच्या आतच त्या हल्लेखोरांना शोधून गुजतराच्या भुज येथून अटक केली. त्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू ठेवत हल्ल्याची पाळंमुळं शोधून काढली. हल्लेखोरांना मदत करणारे, शस्त्र पुरवणारे दोघे, त्यानंतर त्यांना पैसे देणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनेक शूटर्सना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून बरीच महत्वाची माहिती समोर आली. सलमानच्या घरावरील हल्ल्याचं प्लानिंग अनेक महिने सुरू असल्याचं तसेच त्याचं वांद्रे येथील घर, पनवेल येथील फार्महाऊस याची रेकी करण्यात आली होती, अशी माहिती उघड झाली.
याप्रकरणी सलमान खान याचाही जबाबा नोंदवण्यात आला. त्यानंतरही सलमाननला अनेकदा लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना आता लॉरेन्स बिशनोई याची चौकशी करायची असून त्यामधून अनेक महत्वपूर्ण खुलासे होऊ शकतात. मात्र लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुंड आहे त्यामुळे अश्या आरोपीना शक्यतो तुरुंगाच्या बाहेर काढले जात नाही. कायद्यात असलेल्या या तरतुदीमुळे मुंबई पोलिसांना लॉरेन्सची कोठडी घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकार आता केंद्रीय गृहविभागाची मदत घेणार आहे. यामध्ये सुट देऊन लॉरेन्सची कोठडी मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्रीय गृहविभागाला पत्र लिहीलं आहे. सध्या साबरमती जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्सचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचा खटाटोप सुरू आहे. गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोक्का लावला असून लॉरेन्सच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात. त्याचा ताबा मिळाल्यास त्याची कसून चौकशी करण्यात येईल. आता राज्य सरकारच्या या पत्राला केंद्रीय गृहविभागाकडून लवकरच यावर उत्तर मिळणे अपेक्षित आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.