मुंबईमधील वरळी येथील हिट अँड रन केसमध्ये पोलिसांच्या कारवाईला वेग येताना दिसत आहे. रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास बीएमडब्ल्यू गाडीने दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्याला धडक दिली. त्यानंतर गाडीवरील महिलेला काही किलोमीटर फरफटत नेलं. बीएमडब्ल्यू कार चालकाचं नाव मिहिर शाह असून तो फरारा झालाय. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सहा पथके रवाना झाली आहेत. तर आरोपीच्या गर्लफ्रेंडला चौकशीसाठी बोलावलं असून तिचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केलीये.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये राजेश शाह आणि त्यांचा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पोलीस चौकशीवेळी अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं राजेश शाह यांनी सांगितलं. मात्र अपघात झालेल्या दाम्पत्यामधील पतीने फरार असलेला मिहिर शाह हाच गाडी चालवत असल्याचं म्हटलं आहे.
मुंबईमधील वरळी येथे सकाळ पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांची साडी कारच्या चाकात अडकली त्यानंतर महिलेला काही किलोमीटर फरफटत नेलं. महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीच्या अंगावरील कपडेही फाटले होते. वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहतं.
दरम्यान, फरार आरोपी मिहिर शाह याचा पोलीस शोध घेत आहेत. अपघात झाला त्यावेळी त्याने ड्रिंक केलेली का? या अंगाने पोलीस तपास करतायेत. सीसीटीव्ही समोर आलेत त्यामध्ये मिहिर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज जुहू व्हॉईस ग्लोबल तपस बारच्या बाहेरचे आहे.