यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर उरणमधील वातावरण अजूनही तापलेलं आहे. यशश्रीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणाची माहिती देण्यास तो टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पोलीस त्याच्याकडून कसून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या प्रकरणी आता एक माहिती समोर येत आहे. हत्येच्या काही मिनिटे आधी यशश्रीने तिच्या एका मित्राला फोन केला होता. त्याच्याकडे ती गयावया करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यशश्री शिंदे हिने हत्येच्या काही मिनिटे आधी तिच्या मित्राला फोन केला होता. “मी अडचणीत आहे. मला यातून सोडव”, अशी गयावया तिने आपल्या मित्राकडे केली होती. या फोननंतर काही मिनिटातच यशश्रीची हत्या करण्यात आली होती. अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. यशश्रीने हत्येपूर्वी कुणाकुणाला फोन केला होता, याची आता पोलीस चौकशी करणार असून त्यातून अजून बरीच माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी
दाऊद शेख हा यशश्रीकडे लग्नासाठी तगादा लावत होता. तिच्यावर दबाव टाकत होता. पण त्याला यशश्रीने नकार दिला होता. मला भेटायला आली नाहीस तर आपले फोटो फेसबुकवर टाकेल अशी धमकी त्याने यशश्रीला दिली होती. आरोपीने काही फोटो फेसबुकवर टाकलेही होते. पण नंतर त्याने हे फोटो डीलिट केले होते, अशी माहिती मिळत आहे. यशश्री आरोपीपासून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करत होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
हत्येच्या एक दिवस आधी भेटला
यशश्रीने दाऊदपासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतरही दाऊद शेख हा मोहसीनच्या मोबाईलवरून तिला कॉल करायचा. हत्येच्या एक दिवस आधीही दाऊद तिला भेटला होता. त्यानंतर हत्ये दिवशीही तिला भेटला आणि तिची हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, तिचा मोबाईल पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस तिच्या मोबाईलचा शोध घेत आहेत.
शालेय जीवनापासून मैत्री
दरम्यान, दाऊद आणि यशश्री यांची शालेय जीवनापासून मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. दाऊदने तिला लग्नाची मागणी घातली होती. तसेच तिच्यामागे लग्नाचा तगादाही लावला होता. दाऊदला यशश्रीबरोबर बंगळुरूमध्ये स्थायिक व्हायचं होतं. पण तिने नकार दिला होता. त्यामुळेच त्याने तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी म्हणजे 2019मध्ये यशश्रीच्या नातेवाईकांनी दाऊदच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो तुरुंगातही गेला होता. त्यानंतर तो काही काळ कर्नाटकात होता. पण उरणला परत आल्यावर त्याने पुन्हा एकदा यशश्रीशी संपर्क साधला होता. त्यावेळी दोघांनीही भेटायचा निर्णय घेतला होता. या भेटीत यशश्रीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता, अशी माहिती पुढे आली आहे.