पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. शरद मोहोळ याला त्याच्या घराजवळच गोळ्या घातल्या होत्या, त्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान मोहोळ याचा मृत्यू झाला. शरद मोहोळच्या खूनाची बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली होती. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत अवघ्या आठ तासात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह सात जणांना पोलिसांना अटक केली.
मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याचाच साथीदारच होता. मुन्ना आणि शरद मोहोळ यांच्यात आधी जमिनीच्या पैशातून वाद झाला होता. या वादातूनच मोहोळ याने मुन्नाला मारहाण केल्याची माहिती समजली आहे. या वादानंतरच मुन्ना याने मोहोळला संपवायचं ठरवलं असावं. आरोपी मुन्ना साथीदारांसह शरद मोहोळच्या घरी आला. शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस असल्याने सर्वांनी घरीच जेवण केलं.
जेवण केल्यानंतर सगळे बाहेर आले, शरद मोहोळ पुढे चालला होता आणि मुन्ना पोळेकर त्याच्या साथीदारांसह मागे चालला होता. काही वेळात मुन्ना याने मोहोळवर चार गोळ्या झाडल्या. पहिली गोळी पायाला लागली तर दोन गोळ्या पाठीत मारल्या. मागून कोणी हल्ला केला हे पाहण्यासाठी मोहोळ मागे फिरला तेव्हा त्याच्या छातीत गोळी मारली. गोळ्यांचा आवाज झाल्याने आजूबाजूचे सगळे बाहेर आले. त्यावेळी सर्व आरोपी पसार झाले होते. त्यानंतर शरद मोहोळ याला जवळच्या सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
शरद मोहोळ याला भरदिवसा गोळ्या घालून संपवल्याने टोळी युद्ध परत सुरू तर नाही झालं? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण काही वेळाने मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याला गोळ्या मारल्याचं समजलं. पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली होती.
दरम्यान, पोलिसांना पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते शिरवळ दरम्यान एक संशयित स्विफ्ट दिसली. या गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोन चार चाकी गाड्या 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंडही ताब्यात घेतले आहेत. मुन्ना पोळेकरसोबत नामदेन कानगुडे, नितीन कानगुडे आणि गांडले अशी तीन आरोपीचं नावं समजली आहेत.