नाशिक : एकीकडे लाडक्या बाप्पाला गणेश भक्त निरोप देत असतांना नाशिकमधील प्रसिद्ध फर्निचर (Businessman) उद्योजक शिरीष सोनवणे यांचे अपहरण झाले होते. दोन दिवसांनी मात्र शिरीष यांचा मृतदेहच आढळून आल्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. शिरीष यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच हा घातपात असल्याचा संशय मालेगाव पोलीसांना आला होता. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी अद्यापही संशयित आरोपी पोलीसांच्या (Police) हाती लागले नाहीये. शिरीष यांचा मृतदेह मालेगाव हद्दीत आढळून आल्याने मालेगाव पोलीसांत याबाबत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. मात्र, आता तोच गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
शिरीष सोनवणे यांचे स्विफ्ट कारमधून अपहरण झाल्याची पोलीसांच्या लेखी नोंद आहे. कारखान्यातील कामगाराने दिलेल्या माहितीवरून ही नोंद आहे.
स्विफ्ट कारमध्ये तिघे असल्याची माहिती तक्रारीत असल्याने तिघांच्या विरोधात मालेगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात आता मालेगाव येथील गुन्हा वर्ग करण्यात आला असून पुढील सर्व तपास नाशिकरोड ठाण्यातील पोलीस करणार आहे.
नाशिकरोड ते सिन्नर परिसरात शिरीष यांचा कारखाना असल्याने नाशिकरोड पोलिसांत हा गुन्हा वर्ग केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिरीष यांचे अपहरण होऊन चार दिवस उलटले मात्र अद्यापही या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
आर्थिक व्यवहारातून हे अपहरण आणि नंतर हत्या केल्याचा संशय पोलीसांना आहे. त्यामुळे पोलीसांच्या तपासाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
कोण होते शिरीष सोनवणे-
शिरीष सोनवणे हे नाशिकमधील प्रसिद्ध फर्निचर उद्योजक होते. त्यांचा सिन्नर येथे कारखाना आहे. शिरीष यांच्या कारखान्यात विशेषतः शालेय बेंच बनविण्याचे काम केले जाते. शिरीष यांचे संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, कॉलजमध्ये बेंच देण्याचं काम असल्याने त्यांची मोठी ओळख निर्माण झालेली होती.