नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या आधारतीर्थ आश्रमात धक्कादायक घटना समोर आली आहे. अलोक विशाल शिंगारे या चार वर्षीय बालकाचा खून झाला आहे. खरंतर आधारतीर्थ आश्रम हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आणि गरीब कुटुंबातील मुलांकरिता असलेलं केंद्र म्हणून संपूर्ण राज्यात आहे. याच आधारतीर्थ आश्रमात मुलांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या घटणेने खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाय. एस. खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिकचा तपास केला जात आहे.
अलोक शिंगारे या चार वर्षीय बालक आश्रमात सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरच्या बाजूला पडलेला अवस्थेत आढळून आला होता.
आश्रमातील कर्मचाऱ्यांनी अलोक याला लागलीच उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, त्यामध्ये अलोक याला मृत घोषित केले होते.
अलोक याचा मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यामध्ये अलोकचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
अलोक याचा भाऊ देखील याच आश्रमात आहे. अलोकचे काही मुलांसोबत भांडण झाल्याने त्यातून हा प्रकार घडला असवा असा संशय व्यक्त केला जात आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असतांना महिला बाल कल्याण विभागाच्या मदतीने मनोसपचार तज्ज्ञांची मदत घेऊन समुपदेशन करून खुनाचा शोध घेतला जाणार आहे.
वारंवार या आधारतीर्थ आश्रमाबाबत तक्रारी प्राप्त होत असतांना आश्रमातच खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.