सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 25 जानेवारी 2024 : चोरीच्या, गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोरीसाठी हे गुन्हेगार काय शक्कल लढवतील, काही नेम नाही. एटीएम फोडून चोरी करणाऱ्या अशाच दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चोर पार उत्तर प्रदेशातून नागपूरमध्ये आले आणि तेथे चोरी केली , असं समोर आलं आहे. नागपूरमधील धंतोली पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
हे दोघेही कुख्यात गुन्हेगार असून त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन अशा चोरी केल्याचं समोर आलं आहे. ते एटीएम कार्ड टाकून पैसे काढयचे, मात्र मशीन सुरू होताच त्याचं हूड काढून त्याच्यातून पैसे काढून घ्यायचे. मात्र बँकेत जाऊन पैसे निघालेच नाहीत असं सांगत बँकेतूनही पैसे उकळायचे. अशी युक्ती करून ते डबल पैसे उकळायचे. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकून अटक केली.
असा उघडकीस आला गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते एटीएम मध्ये कार्ड टाकून पैसे विड्रॉल करायचे मशीन सुरू होताच मशीनचं हूड काढून त्यातील पैसे काढून घ्यायचे आणि बँकेला आमचे पैसे निघालेच नाही असं क्लेम करत बँकेकडून पुन्हा पैसे घ्यायचे. नागपूरच्या अजनी चौकातील एटीएम मध्ये सुद्धा यांनी हाच प्रकार केला. एक भामटा एटीएममध्ये गेला, त्याने स्वतः जवळचं एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकलं. मात्र हे मशीन सुरू होताच त्याने आपल्याजवळ असलेलं इन्स्ट्रुमेंट वापरत एटीएम मशीनचं समोरचा हूड काढलं आणि पैसे काढून घेतले.
हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि बँक मॅनेजरने ते पाहिलं. त्यांनी तातडीने धंतोली पोलिसांना फोन करून या चोरीची माहिती दिली. पोलिसांनी लगेच तत्परता दाखवत घटनास्थळ गाठलं आणि एटीएम च्या बाहेर उभे असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मात्र ते कोणतीही कबुली द्यायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी जेव्हा त्यांना हिसका दाखवला तेव्हाच त्या भामट्यांनी चोरीची कबुली दिली.
आपले नातेवाईक आणि स्वतःकडे असलेली कार्ड, अशी ८-१० एटीएम कार्ड सोबत ठेवायचे. त्या कार्ड्सचा वापर करत मशीन सुरू करायचे आणि आपल्या जवळ असलेल्या इन्स्ट्रुमेंटने एटीएमचं हूड काढून त्यातील पैसे काढून घ्यायचे. नंतर बँकेत जाऊन आपल्याला पैसे मिळालेच नाहीत असा कांगावा काढून डबल पैसे मिळवायचे अशी त्यांची मोडस ऑपरंडी ( गुन्ह्याची कार्यपद्धती) होती. याआधी देखील त्यांनी नागपूरमध्ये असाच कारनामा करत बरेच पैसे लुटले होते. एवढंच नव्हे तर विविध राज्यात जाऊन ते असेच गुन्हे करायचे, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यांनी अजून कुठे असे गुन्हे केलेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.