नागपूर | 28 फेब्रुवारी 2024 : राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव अक्षरश: मुठीत धरून जगत आहेत. आता नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ८ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा दुर्दैवी अंत झाला आहे. शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसीच्या बीड गणेशपूर येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. रणजित नत्थू चौधरी असं आरोपीचं नाव असून त्याने सुनिता या महिलेची हत्या करून आत्महत्येचा प्रय्तन केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणजित आणि मृत महिला सुनिता हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशच्या पांडुरणा येथील रहिवासी आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते दोघं लिव्ह-इनमध्ये रहात होते. त्यांच्यासोबत सुनिता हिची तीन मुलंही रहायची. सोमवारी सुनिता आणि रणजित यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. नंतर ते भांडण मिटलं आणि सगळं काही सुरळीत झालं. मात्र, सोमवारी झालेल्या वादाचा राग आरोपीच्या मनात होता. तोच राग मनात ठेवून त्याने संतापाच्या भरात सुनिता हिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली . ती मृत झाल्यानंतर आरोपी रणजितने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रणजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आठ वर्षांपासून होते संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित व सुनिता हे आठ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये रहायचे. पण आरोपी रणजित हा कामानिमित्त पुण्याला रहायचा. अधूनमधून तो सुनिताला भेटण्यासाठी नागपूरला यायचा. घटनेच्या आदल्या दिवशी त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. मात्र थोड्या वेळाने ते भांडण मिटलं आणि सगळं सुरळीत झालं. पण आरोपीच्या मनात तो राग होताच, त्याच रागातून त्याने हे नृशंस कृत्य केलं आणि स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला.