नागपूर : नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime)च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या चलाखीने ऑनलाईन फसवणुकी (Online Fraud)चे धंदे करू लागले आहेत. अशाच एका गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी मोठ्या व्यापाऱ्याचे नाव सांगत बँकेतून तब्बल 41 लाख रुपयांचे व्यवहार करीत बँकेची फसवणूक (Cheating) केली आहे. बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
वाधवाणी हे शहरातील नामांकित व्यापारी आहेत. त्यांचा याच बँकेतून मोठा व्यवहार होतो. त्यामुळे अर्जेंट असल्याचे सांगितल्याने मॅनेजरने त्यांचं काम केलं. मात्र त्याच बँकेची फसवणूक झाली.
ऑनलाईन फसवणूक करणारा भामटा फरार झाला असून त्या अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नामांकित व्यापाऱ्याचं नाव सांगत बँक मॅनेजरला फोन करून 2 करोडची एफडी करायची असल्याचं सांगितलं. मात्र त्याआधी माझ्या खात्यातून काही ट्राजेक्शन करायचं आहे ते करा असे ऑफिसरला सांगत सायबर गुन्हेगाराने थाप मारली.
आरोपीने व्यापाऱ्याच्या खात्यातून 41 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात टाकायला सांगितलं. बँकेचे जुने आणि मोठे ग्राहक असल्याने मॅनेजरने ट्राजेक्शन करून दिले.
व्यापाऱ्याच्या कार्यालयात मॅनेजर पोहचल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की, आम्ही कुठलंही ट्राजेक्शन करायला सांगितलं नाही किंवा एफडी सुद्धा करायची नाही. यावरून फ्रॉड झाल्याचं लक्षात आलं आणि सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी बजाज नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. कुठलाही व्यवहार करताना सावध राहून करावा असे आवाहन पोलीस करत आहेत.