नागपूर : दुचाकी दुरुस्त करणारा मेकॅनिकच बाईक (Bike) चोर निघाला आहे. गाडी दुरुस्त करता करता चोरीच्या गाडीचे सुटे भाग करून ते विकण्याचा धडाका लावला आणि आता तुरुंगात पोहोचला आहे. मोहम्मद इरफान असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आरोपी चोरीच्या मार्गाला लागला आणि तुरुंगात पोहचला. आरोपीकडून चोरी (Theft) केलेल्या सहा बाईक तहसिल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपीने आतापर्यंत किती बाईक चोरल्या आणि कुणाकुणाला त्याचे पार्ट्स विकले याबाबत तहसिल पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मेयो रुग्णालयातून बाईक चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरी प्रकरणाचा तपास करत असताना पोलिस मोहम्मद इरफानपर्यंत पोहचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून 6 चोरीच्या बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इरफानकडून पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान हा गाडी मेकॅनिक असून, त्यातून कमी उत्पन्न मिळत असल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला. बाईक चोरी करून त्याचे सुटे भाग करून विकण्याचा धडाका लावला. कमी वेळेत कमी मेहनतीने जास्त पैसा मिळत असल्याने त्याला चोरी करण्याची सवय लागली. मात्र आता पोलिसांच्या जाळ्यात फसल्याने इरफानला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. (A mechanic who stole a bike and sold its parts was arrested by Nagpur police)