नागपूर : नागपुरात आई वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या संशयातून आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण (Beating) केली. या मारहाणीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई वडील आणि मावशीला अटक (Arrest) केले आहे. तसेच भूत उतरवण्याचा उपाय सांगणाऱ्या संशयित भोंदू बाबाला ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ चिमणे, रंजना चिमणे अशी नराधम आई-वडिलांची नावे आहे. विशेष म्हणजे आई वडिलांनी मुलीच्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला. त्यावरून पोलिसांकडे अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य करणाऱ्या या आई वडिलांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागपूरच्या सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलगी सतत आजारी होती, तसेच संस्कृत श्लोक बडबडायची. तिचे हे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. त्यांनी तिला एका भोंदू बाबाकडे नेले. या भोंदूबाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि मुलीच्या मावशीने घरातच भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला हातपाय बांधून बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली ही जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.
आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला. मात्र त्यांच्या गाडीची डॅश एका दुचाकीला लागली आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या काही गडबड असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी गाडीचा फोटो काढला आणि पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचा मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवला याची माहिती मिळवली. मृतदेह ज्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आला, त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. आणि या प्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर संशयित भोंदू बाबाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु आहे. (A six year old girl died in Nagpur after being beaten up by her parents)