नागपूर : नदीच्या काठावर उभा राहून लघुशंका करताना पाय घसरल्याने नाग नदीत एक तरुण (Youth) वाहून गेल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. शुभम हातमोडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाला नदीत पडताना पाहून तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा केला. मात्र शुभम तोपर्यंत वाहून (Drown) गेला. नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि तरुणाचा शोध (Search) सुरु केला. मात्र अद्याप शुभमचा शोध लागला नाही. नागपूरमध्ये सध्या पावसाचा जोर सुरु आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
धंतोली परिसरात आज सकाळी शुभम हातमोडे हा नाग नदीच्या काठावर उभा राहून लघुशंका करीत होता. नाग नदीची संरक्षक भिंत आधीच कोसळली आहे. त्यात अचानक काठावरील माती घसरल्याने शुभम नदीत पडला. सतत पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रवाह जोरात आहे. यामुळे शुभम पाण्यात पडल्यानंतर प्रवाहाबरोबर वाहत गेला. तेथे उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा सुरु केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शुभमला वाचवणे शक्य झाले नाही. नागरिकांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. गायत्री मंदिर चौकात अग्निशमन दलाने शुभमचा शोध सुरू केला. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नसून, अग्नीशमन दलाकडून शोधकार्य सुरुच आहे. नदीला मोठा फोर्स असल्याने दूरपर्यंत तो वाहत गेला असावा, असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीनेही शोध कार्य सुरू आहे. (A young man was swept away in the Nag river in Nagpur)