नागपूर : तुम्हाला कोरोनाचे पैसे मिळवून देतो असं सांगत वृद्ध महिलांचे दागिने लुटणाऱ्या एका 55 वर्षीय महिला चोराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने आतापर्यंत अकरा ठिकाणी महिलांचे दागिने लुटल्याचे उघड झाले आहे. तर या महिलेवर छत्तीसगडमध्ये सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे समोर आलं आहे. निशिगंधा रामटेके असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
कोरोनाचे पैसे मिळवून देण्याचा बहाण्याने वृद्ध महिलांचे दागिने लुटण्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी पंधरा दिवसांपासून या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
पोलीस महिलेचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. मात्र महिला सापडत नव्हती. तपासादरम्यान लुटीच्या उद्देशाने ही महिला पुन्हा नागपुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखा पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तिची विचारपूस केली असता ती महिला गोंदिया जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. ही महिला आपल्या वयाचा फायदा घेत वृद्ध महिलांना हेरायची. मग त्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारायची.
मग कोरोना काळात पैसे मंजूर झाले आहेत, ते मी तुम्हाला मिळवून देऊ शकते असं सांगत वृद्ध महिलांना बँकेपर्यंत घेऊन जायची. आधी स्वतः बँकेत जाऊन परत यायची, त्यानंतर त्या महिलेला तुम्ही जाऊन आतमध्ये अधिकाऱ्याला भेटा माझं बोलणं झालंय असे सांगायची.
मात्र तुमच्याजवळ असलेले दागिने तुम्ही काढून माझ्याकडे द्या. तुमच्याजवळ दागिने दिसल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही, अशी थाप देत त्या महिलांकडून दागिने घ्यायची. पीडित महिला बँकेत गेली की ही तिथून पसार व्हायची. अशा प्रकारे या महिला चोरटीने 11 महिलांना गंडा घातला.
नागपुरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये या महिलेवर गुन्हे दाखल आहेत. तर छत्तीसगडमध्ये सुद्धा या महिलेवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं पुढे आलं आहे.
गोंदिया जिल्ह्यातून ही महिला नागपुरात यायची. नागपुरात आल्यानंतर वृद्ध आणि गरजू महिलांना हेरून त्यांना आपला शिकार बनवत होती. मात्र आता तिचा भांडाफोड झाला आहे आणि तिला जेलची हवा खावी लागणार आहे. अशा महिलांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस करत आहेत.