अकोला : अकोल्यात शगुन कॅटरर्सच्या मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसिक त्रासाला कंटाळून अल्पेश उपाध्याय यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. उपाध्याय यांच्या सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोला जुने शहरातल्या जयहिंद चौक परिसरात सोमवारी ही घटना उघडकीस आली. 34 वर्षीय अल्पेश अरविंद उपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते शगुन कॅटरर्स नावाने व्यवसाय चालवत होते.
नेमकं काय घडलं?
अल्पेश उपाध्याय यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. कोरोनाच्या काळात या तिघांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं उपाध्याय यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी जुने शहर पोलीस तपास करत आहेत.
चंद्रपुरात मेस संचालक दाम्पत्याची आत्महत्या
दरम्यान, चंद्रपुरात भोजनालय चालवणाऱ्या संचालक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असलेल्या भोजनालयातच गळफास घेतलेल्या अवस्थेत दाम्पत्याचे मृतदेह कुजलेले आढळले होते. आत्महत्येच्या तीन-चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर माँ ममता भोजनालय आहे. या भोजनालयाचे मालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) आणि त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) यांनी आत्महत्या केली होती.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
भोजनालयाच्या लगतच्या टॉवर टेकडी, जुनोना रोड बाबुपेठ येथे दुबे दाम्पत्याचे वास्तव्य होते. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या 3 ते 4 दिवसांपूर्वी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला.
संबंधित बातम्या :
कॉलेजसमोरच्या भोजनालयात मालक दाम्पत्याची आत्महत्या, मेसमध्येच गळफास घेतलेले मृतदेह आढळले
कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या
कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी
(Akola Caterer Commits Suicide Writes names of three people in Suicide Note)