अकोला : अकोला (Akola Rain News) जिल्ह्यातील अकोट (Akot Taluka, Akola) तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. आजोबांसह नातूही बुडाला (Grand father and grandson drown) असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत वृद्ध आजोबांचा मृतदेह हाती लागला आहे. तर अजूनही नातवाचा शोध सुरु आहे. या घटनेनं संपूर्ण अकोट तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. प्रभाकर प्रल्हाद लावणे, वय 62, असं मृत्यू झालेल्या आजोबांचं नाव आहे. तर आदित्य विनोद लावणे, वय 11 असं सध्या बेपत्ता असलेल्या नातवाचं नाव आहे. बेपत्ता नातवाचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जातो आहे. लावणे कुटुंबीय तांदुळवाडी इथं राहत होते. दरम्यान, आदित्य हा त्यांचा एकुलता एक नातू होता. तो बेपत्ता असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.
अकोट तालुक्यातील एका कुटुंबातील आजोबा आपल्या नातवासह जात होते. म्हशीचा शोध घेण्यासाठी ते दोघेही घरातून निघाले होते. दरम्यान, मोहाळी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याचं त्यांनी पाहिलं. पण त्यानंतरही त्यांनी पुराच्या पाण्यातून पुलावरुन जाण्याचं धाडस केलं. पण हे धाडसंच त्यांच्या जीवावर बेतलं. अखेर दोघेही जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
बराच वेळ आजोबा आणि नातू घरी परतले नाही म्हणतून शोधाशोध सुरु झाली. अखेर पोलिसांना कळवण्यात आलं. अकोटचे तहसीलदार निलेश मडके आणि अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर शोध घेण्यात आला असता आजोबांचा मृतदेह हाती लागला आहे. तर नातवाचा अजूनही शोध घेतला जातो आहे.
मुसळधार पावसात नातूदेखील वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव यंत्रणा नातवाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत. मात्र आजोबा आणि नातू वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
अकोला जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहू लागलेत. तर अकोट शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोल्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नवगाजी प्लॉट, पाचपोर प्लॉट यामधील नाल्याचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय. त्यामुळे लोकांचीही तारांबळ उडाली. 10 सप्टेंबरपासून अकोल्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण अकोल्याला झोडपून काढलंय.