अमरावती : एकाच कुटुंबातील तिघा जणांचा अपघाती मृत्यू (Family Killed in Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील माऊंट अबू (Mt Abu Rajasthan) येथून परत येताना कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी (Morshi Amravati) तालुक्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. आई-वडील आणि मुलगी अशा तिघा जणांचा अपघातात करुण अंत झाला. मयत मुलगी पेशाने डॉक्टर असल्याची माहिती आहे. तर जावई आणि नात असे दोघं बापलेक गंभीर अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महादेव श्रीनाथ, पत्नी इंदिरा श्रीनाथ आणि मुलगी डॉ. वृषाली मोरे यांना अपघातात प्राण गमवावे लागले. या तिघांचेही मृतदेह आज मोर्शी येथे आणले जाणार आहेत.
संबंधित कुटुंब प्रवास करत असलेली आलिशान कार पुलाच्या भिंतीवर आदळली. सर्व जण राजस्थानमधील माऊंट अबू येथे फिरायला गेले होते. तिथून परत येत असताना उदयपूरमध्ये हा अपघात झाला. अपघातात तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
38 वर्षीय डॉ. वृषाली मोरे, वडील महादेव श्रीनाथ आणि आई इंदिरा श्रीनाथ हे अपघातात मृत्युमुखी पडले, तर डॉ. मोरे यांचे पती आणि लहानगी कन्या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तिघांचेही मृतदेह आज मोर्शी येथे आणले जाणार आहेत.
शनिवारी राजस्थानमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये एकूण सहा जणांना प्राण गमवावे लागले. भरतपूरमध्ये झालेल्या अपघातात तिघं, तर उदयपूरमघील अपघातात तिघांचा अंत झाला. भरतपूरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने लहान मुले आणि महिलांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात तीन मुलींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
प्रिन्सी (10), जान्हवी (8) आणि पूजा (18) अशी मृतांची नावे आहेत. डीग येथे लग्नाआधीच्या काही विधींनंतर परत येत असताना महिला आणि मुलांना हा अपघात झाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
अहमदनगरच्या श्रीगोंद्यात भीषण अपघात, कारची ऊसाच्या ट्रेलरला धडक, तीन मित्रांचा तो प्रवास ठरला अखेरचा
टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार
बैलगाडा शर्यतीहून परतताना काळाचा घाला, पुण्यात 16 जणांसह निघालेल्या पिकअपचा टायर फुटला आणि…